विद्यार्थी `येस मॅडम`ऐवजी म्हणतयात `जय श्रीराम`, गुजरातच्या शाळेतला व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?
Jay ShreeRam In School: हजेरीवेळी विद्यार्थ्यांच्या `जय श्रीराम` उच्चारण्यावर शिक्षिकेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
Jay ShreeRam In School: अयोध्येतीम मंदिरात 22 जानेवारीला रामललाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक घरांतून अयोध्येला जाण्याची तयारी केली जात आहे. लग्न तसेच विविध सोहळ्यात प्रभू श्रीरामासंबंधी गाणी वाजवली जात आहेत. आता एका शाळेतून प्रभू श्रीरामाच्या नावाच्या घोषणा दिल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या शाळेतला हा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे.
एक व्हिडीओ सोशल मीडियात सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये हजेरी घेताना एक अनोखी घटना समोर आली आहे. तुम्ही असा प्रकार कधी कोणत्या शाळेत पाहिला नसेल. या घटनेत शाळेतील वर्गशिक्षिका हजेरी घेत आहेत. हजेरी घेतना सर्वसाधारणपणे मुले येस मॅडम असे म्हणणे अपेक्षित असते. पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत सर्व मुले 'येस मॅडम' ऐवजी 'जय श्री राम' म्हणताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या 'जय श्रीराम' उच्चारण्यावर शिक्षिकेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. संबंधित शिक्षिका त्यावर व्यक्त न होता पुढील विद्यार्थ्यांची हजेरी घेत राहील्या. यानंतर लहान मुले आपल्या हजेरी क्रमांकाप्रमाणे येस मॅम ऐवजी जय श्री राम-जय श्री राम असे म्हणतच राहिली. वर्गातील कोणीतरी हा व्हिडीओ पूर्णपणे रेकॉर्ड केला आहे. आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
काय आहे व्हिडीओमध्ये?
या व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षिका वर्गात ब्लॅकबोर्डजवळ उभी आहे आणि एकामागून एक विद्यार्थ्यांची नावे घेत आहे. हजेरीवेळी अनेक मुले उभे राहून जय श्री राम म्हणत आहेत तर काही मुले हात जोडून जय श्री राम म्हणत आहेत.
हजेरी घेताना शिक्षक किंवा अन्य कोणीतरी त्यांना असे करण्यास सांगितले असावे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर यूजर्स देत आहेत. aaravxelvish ने आपल्या X अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून आतापर्यंत या व्हिडिओला 8 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
अनेक व्हिडीओ समोर
असे अनेक व्हिडीओ आता सोशल मीडियात दिसू लागले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 'आता ही कोणती शाळा आहे? इतर कोणत्याही धर्माची मुले असतील तर ते त्यांच्या देवाच्या नावाने बोलतील का? असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. दुसर्या युजरने 'शाळेत हजेरी घेताना, येस सर, येस मॅडम म्हणू नका, तर जय श्री राम' म्हणा असा सल्ला दिला आहे.
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर अभिषेक केला जाणार आहे. भारतात श्री राम मंदिराच्या उभारणीवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने रील तसेच गाणी बनवत आहेत. सोशल मीडियात हा कंटेटं खूप व्हायरल होतोय. त्यात आता या एका व्हिडीओची भर पडली आहे.