बंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर
बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत.
बंगळुरुत तब्बल 15 शाळांना बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. शाळांना शुक्रवारी सकाळी ई-मेल पाठवून ही धमकी देण्यात आली. शाळेच्या आवारात स्फोटकं ठेवली असल्याचा दावा या ई-मेल्समध्ये करण्यात आला आहे.
बॉम्बहल्ल्याची धमकी देणारे ई-मेल्स आल्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं. यानंतर पोलिसांकडून शाळेच्या आवारातील संशयास्पद वस्तूंचा शोध घेतला जात आहे. याशिवाय बॉम्बशोधक पथकांनाही पाचारण करण्यात आलं आहे. व्हाईटफिल्ड, कोरेमंगला, बसवेशनगर, यालहंका आणि सदाशिवनगर येथील शाळांना ही धमकी देण्यात आली आहे.
दरम्यान या बॉम्बहल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर एका शाळेने पालकांसाठी निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "आम्हाला आज शाळेत अनपेक्षित स्थितीला सामोरं जावं लागत आहे. शाळेला अज्ञात व्यक्तीकडून हल्ल्याची धमकी मिळाली आहे. मुलांची सुरक्षा ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे. आम्ही मुलांना तात्काळ घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे".
गतवर्षी बंगळुरुतील 7 शाळांना अशाच प्रकारे बॉम्बहल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. पण ही धमकी खोटी असल्याचं सिद्ध झालं होतं.