अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले
अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला.
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामभक्तांसह संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. उत्सुकतपोटी अयोध्येत नागरिकांची गर्दी होत आहे. पण दुसरीकडे राम मंदिरावरुन राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेत्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं असून, हा धार्मिक नव्हे तर राजकीय कार्यक्रम असल्याची टीका केली आहे. यादरम्यान अयोध्येत काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता तेथील लोकांसोबत त्याची झडप झाली.
काँग्रेस कार्यकर्ते आणि भक्तांमध्ये ही हाणामारी झाली. यावेळी लोकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातून झेंडा खेचून घेतला. अयोध्येत राम मंदिर दर्शनाच्या वेळी ही वादावादी झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचा झेंडा फडकावण्यावरुन हा सगळा वाद झाला. आरोप आहे की, राम मंदिराच्या प्रवेशद्वारावरच काँग्रेसचे कार्यकर्ते झेंडा फडकावण्याचा प्रयत्न करत होते. तिथे उपस्थित काही लोकांनी याचा विरोध केला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
याआधी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर काँग्रेसच्या उत्तर प्रदेश युनिटचे प्रमुख नेते अयोध्येत रामललाच्या दारात पोहोचले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी अयोध्येत स्नानही केलं होतं.
'काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारलं'
बुधवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं होतं. काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प असल्याचं म्हटलं आहे. या मंदिरामागे भाजपाचा वैयक्तिक हेतू असल्याचा त्यांचा आरोप आहे. पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी भाजपा आणि आरएसएस नेत्यांकडून अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा कऱण्यामागील हेतूची विचारणा केली आहे.
22 जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य पाहुणे असणार आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारचे अधिकारी कार्यक्रमाच्या तयारीत व्यग्र आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या एक आठवडाआधी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी पाहुण्यांना निमंत्रण पाठवलं जात आहे.
मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकची वेळ दुपारी 12.20 वाजता निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे 12:20 वाजता कार्यक्रम सुरू होईल. सर्व विधी वाराणसीचे लक्ष्मीकांत दीक्षित करणार आहेत. प्राणप्रतिष्ठेचा विधी उद्यापासून म्हणजेच 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21जानेवारीपर्यंत पूजा विधी चालणार आहे. मंदिरात रामाच्या बालरूपाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी सांगितले की, 18 जानेवारी रोजी गर्भगृहात रामलल्लाची स्थापना करण्यात येईल. मूर्तीचे वजन 120 ते 200 किलोपर्यंत असेल. 18 जानेवारी रोजी पुतळा पादुकावर ठेवला जाईल. मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी सांगितले की, अयोध्येतील राम मंदिरात स्थापनेसाठी म्हैसूर येथील अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामलल्लाची नवीन मूर्ती निवडण्यात आली आहे. सध्याची रामललाची मूर्तीही नवीन मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.