एनडीटीव्हीच्या प्रणव रॉय यांना सेबीचा दणका; व्यवस्थापकीय पदावरून पायउतार होण्याचे आदेश
सेबीचा हा निर्णय अयोग्य असल्याचे प्रणव आणि राधिका रॉय यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली: सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) शुक्रवारी एनडीटीव्ही लिमिटेडचे प्रवर्तक प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. सेबीने या दोघांवर भांडवली बाजारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यवहार करण्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. तसेच या दोन वर्षांमध्ये प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना एनडीटीव्हीच्या संचालक मंडळात किंवा शीर्षस्थ पदावर राहण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी एनडीटीव्हीचे समभाग हस्तांतरित करताना भांडवली बाजाराच्या नियमांचे योग्य आणि पारदर्शीपणे पालन केले नसल्याचे सेबीकडून सांगण्यात आले. त्यांचा कंपनीतील हिस्सा आणि म्युच्यअल फंडातील गुंतवणूक गोठवण्यात आली आहे. प्रणव रॉय यांच्याकडे एनडीटीव्हीचे सर्वाधिक समभाग आहेत. मात्र, आता सेबीच्या निर्णयामुळे त्यांना कंपनीच्या प्रवर्तक पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
सेबीचा हा निर्णय अयोग्य असल्याचे प्रणव आणि राधिका रॉय यांनी म्हटले आहे. सेबीने काही गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला. त्यामुळे सेबीकडून अयोग्य पद्धतीने निर्णय घेण्यात आला. लवकरच आम्ही याविरोधात न्यायालयात दाद मागू, असे रॉय यांनी सांगितले.
एनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा
एनडीटीव्हीच्या प्रवर्तकांची कंपनी 'आरआरपीआर होल्डींग' आणि विश्वप्रधान कमर्शिअल या कंपनीसोबत कर्जासंदर्भात २००८ मध्ये करार झाला होता, मात्र हा करार करताना प्रवर्तकांनी अंधारात ठेवले, असा आरोप 'एनडीटीव्ही'च्या भागधारकांनी केला होता. १४ ऑक्टोबर २००८ ते २२ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत सेबीने चौकशी केली, ज्यात एनडीटीव्ही आणि आयसीआयसीआय बॅंक यांच्या कॉर्पोरेट लोनचा करार झाल्याचे समोर आले. एकाच कंपनीने दोन भिन्न कंपन्यांशी तीन कर्जविषयक करार केल्याने भागधारकांची फसवणूक केल्याचा ठपका रॉय यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सेबीचे पूर्णवेळ संचालक एस.के. मोहंती यांनी सांगितले.