वाराणसी : प्रियंका गांधी वाड्रा यांना उत्तरप्रदेशातल्या सोनभद्रमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा यांनी वाराणसी आणि मिर्जापूर सीमेवर नारायणपूर इथे काँग्रेस कार्यकर्त्यांसह धरणं आंदोलन सुरु केलं. म्हणून प्रियंकांसह काँग्रेस कार्यर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वाराणसीतल्या रुग्णालयात जखमींची भेट घेऊन त्या सोनभद्रला जात होत्या. राज्यात सध्या या प्रकरणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे पोलिसांनी सोनभद्रमध्ये कलम १४४ लागू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनभद्रमध्ये ९० बिघे जमिनीचा वाद होता. सुमारे वर्षभरापासून या जमिनीवरुन वाद होता. १२ सदस्यांच्या ट्रस्टच्या नावे ही जमीन होती. २ वर्षांपूर्वी ट्रस्टनं ही जमीन प्रधान यज्ञवत याला विकली. प्रधान यज्ञवत याला या जमिनीवर ताबा हवा होता. मात्र तीन पिढ्या ही जमीन कसणाऱ्यांनी त्याला विरोध केला होता. त्या जमिनीच्या वादातून गोळीबार केला गेला, त्यात १० लोकांचा मृत्यू झाला.



या प्रकरणाची उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.



प्रियंका गांधी यांनी म्हटलं की, 'आम्ही फक्त पीडित कुटुंबियांना भेटायला जात होतो. माझ्य़ासोबत फक्त ४ जण असतील असं देखील मी सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला का रोखलं याचं त्यांनी उत्तर द्यावं. आम्ही शांततापूर्ण पद्धतीने उपोषण करु.'



पण उपोषणाला बसलेल्या प्रियंका गांधी यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रियंका गांधी यांना चुनार गेस्ट हाऊसला नेण्यात आलं. प्रियंका गांधींनी म्हटलं की, 'मला नाही माहित की मला कोठे घेऊन जात आहेत. पण ते जेथे घेऊन जातील तेथे जाऊ. पण आम्ही झुकणार नाही.'