नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे ( Parliament budget session) दुसरे सत्र आजपासून सुरू होत आहे. दिल्ली हिंसाचारावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शाह यांना आज काँग्रेसकडून टार्गेट केलं जाऊ शकते. निर्भया हत्या प्रकरणातील आरोपी पवनच्या सुनावणीवर आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. त्यामुळे आरोपींना उद्या फाशी देण्यात येणार की नाही याचा निर्णय होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकडे राज्यात विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरण्याची चिन्ह, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि कर्जमाफीच्या यादीतील घोळावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यताय. राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर कालच्या नाणारच्या शिवसेनेच्या विरोधानंतर आज नाणार समर्थकांचा रत्नागिरीत मेळावा होतोय.



देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारी पुन्हा सुरू होत आहे. या दुर्घटनेत ४२ लोक ठार झाले आणि सुमारे ३५० लोक जखमी झाले. याप्रकरणी विरोधक भाजपप्रणीत केंद्र सरकारला तसेच दिल्ली पोलिसांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. या प्रश्नावर भाजपला विरोधक घेरणार आहेत.


या अर्थसंकल्पीय सत्राच्या उत्तरार्धात जोरदार हल्लाबोल होण्याची शक्‍यता आहे. कारण विरोधी पक्ष काँग्रेसने आधीच भाजपवर आरोप केले आहेत. राजधानीत हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला मोठे अपयश आले आहे. या अपयशाला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असून त्यांचा राजीनाम्याची मागणी काँग्रेसने केली आहे.


ईशान्य दिल्लीतील काही भागांत हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि दिल्ली सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शनिवारी पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली असून यात दिल्लीतील हिंसाचाराबाबत संसदेत सरकारच्या बाजू मांडण्याच्या पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे.