जम्मू : जम्मू-काश्मीरमधली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जम्मू जिल्ह्याच्या उपदंडाधिकारी (डेप्युटी मॅजिस्ट्रेट) सुषमा चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू नगरपालिका हद्दीमधून कलम - १४४ हटवण्यात येत आहे. उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय उघडणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मूच्या उपायुक्तांच्या (डेप्युटी कमिश्नर) कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जम्मू जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातून कलम १४४ रद्द करण्यात येत आहे. १० तारखेला सगळ्या शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था सुरू होतील. 


अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा व सुव्यवस्था (एडीजीपी लॉ एन्ड ऑर्डर) मुनीर खान यांच्या म्हणण्यानुसार, जम्मूमध्ये स्थिती सामान्य आणि नियंत्रणात आहे. कायदा आणि व्यवस्था कायम राखण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील. 



कथुआमध्ये गुरुवारी शाळा उघडल्या. रस्त्यावर शाळेत जाणारे विद्यार्थी दिसले. उधमपूरमध्येही शुक्रवारी शाळा उघडल्या. उपायुक्तांच्या माहितीनुसार, कलम १४४ अजूनही लागू आहे परंतु, काही भागांना त्यातून सूट देण्यात आलीय. बाजारपेठाही सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुरू होत्या. 


उल्लेखनीय म्हणजे, काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे. इथं कलम १४४ लागू करण्यात आलं होतं.