नवी दिल्ली: समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारे कलम ३७७ रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते गुरुवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, हा सर्व अमेरिकेचा डाव आहे. या निर्णयामुळे थोड्याच दिवसांत भारतात गे बार सुरु होतील. यामुळे एडस् वेगाने पसरण्याची शक्यता आहे. ही गोष्ट विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सात सदस्यीय खंडपीठ स्थापन करावे. हे खंडपीठ आताचा निर्णय रद्द करेल, अशी आशा करत असल्याचे स्वामी यांनी सांगितले. 


भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम अवैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे भारतात दोन समवयस्क लोकांमधील लैंगिक संबंध गुन्हा ठरणार नसून न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे.