नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन उद्या भारतात परतणार आहेत. पाकिस्तान उद्या अभिनंदन यांना भारतात पाठवणार असल्याची माहिती पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. भारताने पाकिस्तानवर अवलंबलेल्या कूटनीतीचा हा विजय असल्याचे म्हटले जात आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यासंदर्भात घोषणा केली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या निर्णयाचे स्वागत असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आम्ही शांतीचा संदेश देत आहोत, भारताकडूनही त्याचीच अपेक्षा आहे, असे पाकिस्तानतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. आम्ही शांती दूत आहोत असे जगाला दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे. पण पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतंय हे एव्हाना जगाला माहिती पडले आहे. त्यात एअर कमांडर अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढत होता. जिनिव्हा करारामुळे अभिनंदन यांना कोणत्याही प्रकारची इजा होणे पाकिस्तानला झेपणारे नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी केलेल्या वक्तव्यामध्ये भारत-पाकमधील तणाव लवकरच संपेल असे म्हटले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या संसदेत ही घोषणा केली.


कूटनीतीचा विजय



जगातल्या सर्वाधिक यशस्वी कूटनीतीचा आज विजय झाला आहे. पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटला सोडणार असल्याची घोषणा केली आहे.जवळपास वीस वर्षं जैश ए मोहम्मदला पोसल्याचे परिणाम आज पाकिस्तानला भोगावे लागत आहेत. साऱ्या जगात पाकिस्तानला विचारणारे कुणीही उरलेले नाही. 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन'च्या कार्यक्रमालाही पाकिस्तानला जाता येत नाही. पाकिस्तानची ही कोंडी झाली आहे. गेल्या साडे चार-पाच वर्षात मोदी सरकारच्या परिणामकारक परराष्ट्र धोरणामुळे भारताला याचा फायदा झाला आहे.