Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये ( Kupwara) दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलाला मोठं यश मिळाले आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 5 दहशतवाद्यांना (terrorists) ठार केले आहे. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी (ADGP) ही माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे दहशतवादी आणि लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये झालेल्या चकमकीत पाच पाकिस्तानी दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. या भागात सध्या शोधकार्य सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सर्व दहशतवादी पाकिस्तानातून घुसले होते आणि येथे मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. चकमकीनंतरही शोधमोहीम सुरूच आहे, जेणेकरुन अन्य कोणी अतिरेकी राहिल्यास त्याला पकडता येईल. काश्मीरमध्ये या वर्षातील हा सर्वात मोठा घुसखोरीचा प्रयत्न होता, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे, असे काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे.


मारले गेलेले सर्व दहशतवादी कुपवाड्यातील नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त महासंचालक विजय कुमार यांनी सांगितले की, 'कुपवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या पथकांनी नियंत्रण रेषेवर कारवाई केली. या चकमकीत 5 विदेशी दहशतवादी मारले गेले आहेत. सध्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे." याआधी मंगळवारीही कुपवाडा येथील डोबनार माछिल भागात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन अज्ञात दहशतवाद्यांना ठार केले होते.



या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त केली आहेत. यापूर्वी 13 मे रोजी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखली होती. उरी सेक्टरमध्ये हे दहशतवादी मारले गेले होते. 6 मे रोजी एक आणि 4 मे रोजी दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. दोन्ही दहशतवादी शोपियानचे रहिवासी होते आणि मार्चमध्येच दहशतवादी संघटनेत सामील झाले होते.


काश्मीर खोऱ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर, दहशतवाद्यांना यश मिळू नये यासाठी सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे दहशतवादी अस्वस्थ आहेत आणि त्यामुळेच ते सुरक्षा दल आणि बिगर स्थानिक मजुरांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत. गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमधील काही पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हालचालींचाही मागोवा घेतला आहे.