नवी दिल्ली - संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच संसद भवन परिसरात चुकीच्या दरवाज्यातून एका गाडीने आत येण्याचा प्रयत्न केल्यामुळे मंगळवारी दुपारी काहीवेळ सुरक्षारक्षकांना कारवाईसाठी धावपळ करावी लागली. पण ही कार काँग्रेसच्या एका खासदाराची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काँग्रेसचे मणिपूरमधील खासदार डॉ. थोकचोम मेनिया यांची ही गाडी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे सध्या संसद भवन परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यातच मंगळवारी संसद भवन परिसरातील गाड्यांना बाहेर जाण्यासाठी असलेल्या एका दारातून एका गाडीच्या चालकाने आत येण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षारक्षक सतर्क झाले आणि त्यांनी त्वरित पळापळ करीत गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला. गाडीमध्ये कोण आहे, याची स्पष्टता नसल्यामुळे सर्वच सुरक्षारक्षकांना सावध करण्यात आले. या गाडीचा क्रमांक डीएल १२ सीएच ४८९७ असा होता. पण गाडीवर संसद सदस्य असल्याचे एक स्टिकर होते. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी चौकशी केल्यावर गाडी संसद सदस्यांची असल्याचे स्पष्ट झाले.



दरम्यान, ही गाडी बाहेर जाण्याच्या दारातून आत येण्यासाठी पुढे कशी आली, सुरक्षाव्यवस्थेत नक्की कुठे त्रुटी होती, याचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर संसद भवन परिसरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. 


२००१ मध्ये लष्करे तैय्यबाच्या दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या या हल्ल्यात नऊ सुरक्षारक्षकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आज घडलेल्या घटनेमुळे काहीवेळासाठी पुन्हा एकदा त्या कटू स्मृती संसद परिसरात जाग्या झाल्या होत्या.