चौकाचौकात पोलीस, प्रत्येक वाहनाची तपासणी अन्...; हरियाणातील नूहला लष्करी छावणीचं स्वरुप
Security In Haryana Nuh: आज श्रावणी सोमवार असून त्यानिमित्त शोभायात्रेच्या आयोजनाची परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी स्थानिक प्रशासनाने नाकारल्यानंतर या ठिकाणाला लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे.
Security In Haryana Nuh: हरियाणामध्ये जुलै महिन्यात हिंसाचार झालेल्या नूहमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. हिंदू संघटनांनी आज 28 ऑगस्ट (सोमवार) रोजी बृजमंडल शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या शोभायात्रेसाठी परवानगी देण्यात आलेली नाही तरीही ही यात्रा आयोजित करण्यावर हिंदू संघटना ठाम आहेत. त्यामुळेच आज नूहला अगदी लष्करी छावणीचं स्वरुप आलं आहे. नूहमध्ये बाहेरील व्यक्तींना आज प्रवेशबंदी आहे. त्यामुळेच अय़ोध्येवरील आलेले संत जगतगुरु परमहंस आचार्य महाराज यांनाही सोहना टोल नाक्यावर अडवण्यात आलं आहे. हे महाराज याच ठिकाणी बसून प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत. जिल्ह्यामध्ये पोलीस आणि निमलष्करी तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. राज्यभरात तसेच जिल्ह्याच्या सीमांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी करुनच तिला प्रवेश दिला जात आहे.
1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था
नूहमधील प्रशासनाने सुरक्षाच्या दृष्टीने आज शाळा, काँलेज, बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इंटरनेट कनेक्शन आणि बल्क मेसेजची सुविधाही बंद करण्यात आली आहे. नूहमध्ये कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या इथं चारहून अधिक लोक एकत्र सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नाहीत. नूहमधील नलहट येथील शिव मंदिराच्या 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दलांना तैनात करण्यात आळं आहे. याच मंदिराच्या शोभायात्रेदरम्यान 31 जुलै रोजी हिंसाचार झाला होता.
11 जणांना परवानगी
आज नूहमध्ये अगदी स्थानिकांनाही ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, या मंदिराजवळ झालेली मोठी गर्दी लक्षात घेत नूह प्रशासनाने विश्व हिंदू परिषदेच्या 11 जणांना नलहड महादेव मंदिराला जलाभिषेक करण्याची परवानगी दिली आहे. विश्व हिंदू परिषदेने शांततपूर्ण मार्गाने 11 जण शोभायात्रा काढतील असं म्हटलं आहे.
...म्हणून शोभायात्रा प्रतिकात्मक काढणार
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, आज श्रावणी सोमवार आहे. श्रावणातील हा शेवटचा सोमवार आहे. आम्ही साधूंच्या आशिर्वादसहीत 'जलाभिषेक' करत आहोत. आझ वेगवेगळ्या ठिकाणांवरुन आमचे नेते (अलोक कुमार) नलहर मंदिरात येणार आहेत. या ठिकाणी जल अभिषेक केला जाईल. हिंदू समुदायाचे प्रतिनिधी यात सहभागी होतील. सरकारच्या अडचणी आणि जी-20 परिषदेची तयारी सुरु असल्याने आम्ही प्रतिकात्मक शोभायात्रा काढणार आहोत, असं सांगितलं. रात्रीपासूनच जिल्ह्याच्या सीमांवर पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे.
परवानगी नाकारण्याचं कारण काय?
हरियाणा पोलिसांचे प्रमुख शत्रुजीत कपूर यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनाने 3 ते 9 नोव्हेंबरदरम्यान नूह येथे होणाऱ्या जी-20 शेरपा ग्रुपच्या बैठकीमुळे आणि 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानगी नाकारण्यात आली आहे.