नवी दिल्ली : लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने रविवारी दिलासा देणारी बातमी दिली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या कोविड-१९ लसीचं उत्पादन दोन ते तीन आठवड्यात सुरू करायची योजना असल्याचं सीरम इन्स्टिट्यूटने सांगितलं आहे. या लसीचं मानवी परीक्षण यशस्वी राहिलं, तर ऑक्टोबर महिन्यात लस बाजारात येऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जगातल्या इतर ७ कंपन्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत कोरोनाची लस तयार करण्यासाठी पार्टनरशीप केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला म्हणाले, 'आमची टीम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर हिल यांच्यासोबत काम करत आहे. पुढच्या दोन ते तीन आठवड्यामध्ये लसीचं उत्पादन सुरु करण्याची अपेक्षा आहे. पहिले ६ महिने उत्पादनाची क्षमता प्रती महिना ५० लाख लसींची असेल. यानंतर उत्पादन प्रती महिना १ कोटी असण्याची अपेक्षा आहे.'


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने याआधीही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत मलेरिया व्हॅक्सिन प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं. 'कोविड-१९ची लस सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात बाजारात यायची आमची अपेक्षा आहे, फक्त लसीचं परीक्षण यशस्वी आणि सुरक्षित झालं पाहिजे. आम्ही पुढच्या २ ते ३ आठवड्यात या लसीचं टेस्टिंग भारतात सुरू करणार आहोत. भारतात ही टेस्टिंग सुरू करण्यासाठी आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे,' असं पुनावाला यांनी सांगितलं.


सध्याची परिस्थिती बघता या प्रयत्नासाठी आम्ही स्वत: अर्थसहाय्य केलं आहे. उत्पादन वाढल्यानंतर आमचे अन्य पार्टनरही मदत करतील, अशी आशा पुनावाला यांनी व्यक्त केली. 


'कोविड-१९च्या लसीचं उत्पादन पुण्याच्या प्लांटमध्ये केलं जाईल, कारण यासाठी वेगळा प्लांट बनवायचं ठरवलं, तर त्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागेल. कंपनी या लसीचं पेटंट करणार नाही, तसंच फक्त भारतासाठीच नाही तर जगातल्या कंपन्यासाठीही उत्पादन आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. जो कोरोनाची लस विकसित करेल, त्याला उत्पादनासाठी अनेक पार्टनरची गरज पडेल', असं वक्तव्य पुनावाला यांनी केलं.