Seven Minutes of Terror: संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर बुधवारी (23 ऑगस्ट 2023 रोजी) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा म्हणजेच सॉफ्ट लॅण्डींग करण्याच्या तयारीत आहे. भारत यशस्वीपणे चंद्रावर यान उतरवणार की नाही हे अवघ्या तासाभरामध्ये स्पष्ट होणार असतानाच या क्षेत्रातील तज्ज्ञांनी यान चंद्रावर उतरण्याआधीचे काही मिनिटं फार महत्वाचे असतील असं सांगितलं आहे. मोहीम यशस्वी होणार का हे या शेवटच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. ही शेवटची काही मिनिटं अगदी श्वास रोखून धरायला लावणारी असतील. कोणतंही यान एखाद्या ग्रहावर उतरताना त्याला त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाचा सामना करण्याबरोबरच त्याबरोबर जुळवून घेण्यासाठी एका ठराविक पद्धतीने लॅण्डींग करावं लागतं. 


Seven Minutes of Terror म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही यानाला थेट सरळ रेषेत ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरता येत नाही. त्या ग्रहाच्या पृष्ठभागाजवळ जाता जाता त्या ग्रहाला परिक्रमा सुरु ठेवावी लागते. नंतर हळूहळू वेग कमी करुन यानाला पृष्ठभागावर उतरावं लागतं. 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार अंतराळ संशोधनासंदर्भातील तज्ज्ञ या शेवटच्या काही मिनिटांना 'दहशतीचे सात मिनिटं' (Seven Minutes of Terror) असं म्हणतात. या 7 मिनिटांदरम्यान यान स्वत:च्या क्षमतेनं प्रवास करत असतं. त्यावर कोणालाही थेट नियंत्रण ठेवता येत नाही. पृथ्वीवरुनही या 7 मिनिटांदरम्यान यानावर नियंत्रण ठेवणं शक्य नसतं. या कालावधीमध्ये सर्व वैज्ञानिक आणि इंजीनिअर्सही सर्वसामान्यांप्रमाणे केवळ प्रेक्षक असतात असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 


चांद्रयान-2 च्या सॉफ्ट लँडींगच्या वेळेस हीच अडचण आलेली


2019 मध्ये चांद्रयान-2 मोहीमेच्या वेळेस सॉफ्ट लँडींगचा प्रयत्न करताना इस्रोला याचा अनुभव आला आहे. मोहीम यशस्वी होण्यासाठी अगदी शेवटचे काही क्षण उरलेले असतानाच चांद्रयान-2 च्या लँडरची क्रॅश लँडींग झाली होती. आता चांद्रयान-3 सॉफ्ट लँडींगच्या टप्प्यात पोहोचलं आहे. आता चांद्रयान-3 चं नक्की काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर चांद्रयान-3 मधील लँडर चंद्रावर उतरण्याच्या आधीचे 18 मिनिटं फार महत्त्वाची असणार आहेत. चांद्रयानातील विक्रम लँडर यावेळी चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटरवर असेल. यावेळी विक्रम लँडर 1.6 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने चंद्राला प्रदक्षिणा घालत असणार.


इंजिन सुरु होतील अन्...


यानंतर पुढील 11.5 मिनिटांमध्ये चांद्रयान-3 चे इंजिन सुरु होतील. हे इंजिन खरं तर या यानाचा वेग कमी करण्याचं काम करतील. इंजिन सुरु झाल्यानंतर लँडर हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने वाटचाल सुरु करेल. यावेळेस यानाला वेग एक चतृर्थांशने कमी होईल. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे लँडर 60 मीटर प्रति सेकंद वेगाने पृष्ठभागाकडे खेचलं जाईल. वेग मंदावताना चांद्रयान थोडं एका बाजूला झुकेल. मात्र हे नियोजनपूर्वक पद्धतीने केलं जाईल ज्यामुळे निश्चित स्थानावर लँडरला उतरता येईल.


सर्व सेन्सर सक्रीय होतील


यावेळी विक्रम लँडर हे नियोजित लँडींगच्या जागेपासून अवघ्या 32 किलोमीटरवर असेल. तर उंचीनुसार हे चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.5 किलोमीटरवर असेल. ही सर्व प्रक्रिया सुरळीत आणि नियोजित पद्धतीने व्हावी यासाठी बराच अभ्यास चांद्रयानच्या संशोधकांनी केला आहे. लँडर चंद्रावर उतरताना त्याचे सर्व सेन्सर सक्रीय असतील.