शाहरुखला Y+ सुरक्षा... पण X, Y, Z, Z+ Security म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि का देतं?
Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: अभिनेता शाहरुख खानच्या आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
Shah Rukh Khan Gets Y+ Security Every thing About VIP Security in India: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शाहरुख खानचा वांद्रे येथील 'मन्नत' या बंगल्याची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. शाहरुखला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने त्याची सुरक्षा अपग्रेड करुन त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी शाहरुखच्या सुरक्षेसाठी फक्त 2 पोलीस कॉन्स्टेबल होते. पण, आता मात्र त्याला अधिक सुरक्षा पुरवली जाणार आहे. काही काळापूर्वीच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर त्यालाही वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. पण एक्स दर्जाची सुरक्षा, वाय दर्जाची सुरक्षा, वाय प्लस दर्जाची सुरक्षा म्हणजे काय? ही सुरक्षा कोण आणि कशासाठी पुरवतं? यासंदर्भात अनेकांना कल्पना नसते. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
कोण पुरवतं ही सुरक्षा
व्हिआयपी म्हणजेच अती महत्त्वाच्या लोकांना पुरवली जाणारी विशेष सुरक्षा कोणाला पुरवली जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि खेळाडूंना अशी सुरक्षा पुरवली जाते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ही सुरक्षा कोण पुरवतं याबद्दल बोलायचं झालं तर केंद्र किंवा राज्य सरकारकडून ही विशेष सुरक्षा पुरवली जाते. ज्या अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका असतो अशा लोकांना ही वेगवेगळ्या दर्जाची सुरक्षा पुरवली जाते. ही सुरक्षा देताना कोणाला कुठल्या प्रकारची सुरक्षा दिली जावी याचा निर्णय पूर्णपणे सरकारच्या हाती असतो.
सुरक्षेचे प्रकार कोणकोणते?
सुरक्षेचे एक्स, व्हाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे प्रकार आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेळोवेळी या सुरक्षेचा आढावा यंत्रणा घेतात. व्हिआयपी सुरक्षेचा आढावा घेऊन सरकारकडूनच या सुरक्षेच्या दर्जामध्ये अनेकदा बदल केला जातो. मागील काही वर्षामध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, शिवसेनेबरोबरच्या वादानंतर अभिनेत्री कंगना रणौत, एनसीबीचे मुंबईचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली. याच वर्षी जून महिन्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत राज्यामधील सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने कपात केली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करुन ठाकरे कुटुंबियांना झेड प्लस दर्जाऐवजी व्हाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला.
कोणाला कोणती सुरक्षा द्यायची कसं ठरवतात?
व्हिआयपी सुरक्षेसंदर्भातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला धमकी मिळाली किंवा त्याच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली तरच त्याला विशेष सुरक्षा पुरवली जाते. मात्र धमकी मिळाल्याच्या एकमेव आधारावर अशी विशेष सुरक्षा सरकारकडून पुरवली जात नाही. अशी सुरक्षा सामान्यपणे मोठ्या हुद्द्यावर, पदावर असणाऱ्या किंवा प्रभावशाली तसेच अती महत्वाच्या व्यक्तींना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पुरवली जाते. मात्र ही सुरक्षा पुरवण्याआधी केंद्र सरकार अनेक गोष्टींचा विचार करते. अचानक ही सुरक्षा पुरवली जात नाही किंवा काढूनही घेतली जात नाही. पूर्ण नियोजनानंतरच ही सुरक्षा वाढवायची की कमी करायची हे ठरवलं जातं. राज्यातील पोलीस यंत्रणेबरोबरच इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने ही सुरक्षा पुरवली जाते. एखाद्या व्यक्तीला कोणत्याप्रकारची सुरक्षा पुरवली जाणार यासंदर्भातील निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयच घेते. हा निर्णय घेताना देशातील गुप्तचर यंत्रणांकडून म्हणजेच रिसर्च अॅण्ड अॅनलिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ आणि इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच ‘आयबी’चा सल्ला घेतला जातो. सध्या केंद्रीय गृहमंत्रालयाची धुरा अमित शाह यांच्याकडे आहे.
एक्स सुरक्षा –
या कॅटेगरीतंर्गत अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी फक्त 2 जणांची सुरक्षा पुरवली जाते. ही फार बेसिक लेव्हलची सुरक्षा मानली जाते.
वाय सुरक्षा –
वाय कॅटेगरीमधील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी 11 सुरक्षारक्षक तैनात केले जातात. यात 2 कमांडोज, 2 पीएसओंचा समावेश असतो.
वाय प्लस सुरक्षा –
वाय प्लस कॅटेगरीत एकूण 10 सशस्त्र कमांडो सुरक्षेसाठी तैनात असतात.
झेड सुरक्षा –
झेड लेव्हल सुरक्षेत एकूण 22 जणांचा ताफा महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात केला जातो. यामध्ये 4 ते 5 एनएसजी कमांडोंचा समावेश असतो. राज्य सरकार अथवा सीआरपीएफकडून अशी अतिरिक्त सुरक्षा दिली जाते. या सुरक्षेत तैनात असलेल्या कमांडोंकडे सबमशीन गन, स्पेशल कम्युनिकेशन डिव्हाइज असतात. हे कमांडोंकडे मार्शल आर्ट्स तसेच विनाशस्त्र लढण्याचं कौशल्य असतं.
झेड प्लस सुरक्षा –
झेड प्लस लेव्हलमध्ये सुरक्षेत एकूण 36 जण तैनात असतात. यात 10 हून अधिक एनएसजी कमांडो असतात. एसपीजी खालोखाल हे दुसऱ्या दर्जाची महत्त्वाची सुरक्षा आहे.
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) –
एसपीजी सुरक्षेसंदर्भातील फारशी माहिती सार्वजनिक केली जात नाही. यासंदर्भात फार गुप्तता पाळली जाते. विद्यमान पंतप्रधानांबरोबरच माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते.
आता कशी असणार शाहरुखची सुरक्षा...
वाय प्लस सुरक्षेअंतर्गत शाहरुख भोवती 10 सशस्त्र कमांडो सुरक्षेसाठी तैनात असतील. शाहरुखच्या सुरक्षेत 24 तास 6 वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तैनात असतील. शाहरुख सार्वजनिक ठिकाणी जिथे जिथे जाईल तिथे या जवानांचा घेरा त्याच्या भोवती असेल. शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाहेर 5 बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असतील.
इतर कलाकारांना कोणती सुरक्षा पुरवली जाते
अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.