Delhi Violence: जाफराबादमध्ये गोळीबार करणाऱ्या शाहरूख खानला अटक
दिल्लीतील दंगलीवेळी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता.
नवी दिल्ली: दिल्लीतील दंगलीवेळी मौजपूर येथे गोळीबार करणाऱ्या शाहरुख खान (वय २७) या तरुणाला मंगळवारी दिल्ली पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशाच्या शामली येथून पोलिसांनी शाहरुखला ताब्यात घेतले. गेल्या आठवड्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) ईशान्य दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक रुप धारण केले होते. तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या या हिंसाचारात ४७ लोकांचा बळी गेला होता. ही दंगल सुरु असताना सोशल मीडियावर अनेक छायाचित्रे व्हायरल झाली होती.
यापैकी पोलिसांवर पिस्तूल रोखून धरलेल्या शाहरूख खानची छायाचित्रे आणि व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. यावेळी शाहरुखन खानने एका पोलीस कॉन्स्टेबलवर पिस्तूल रोखून त्याला धमकावले होते. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या तरुणाला अटक कधी होणार, असा सवाल विचारला जात होता. अखेर दिल्ली पोलिसांनी शाहरूख खानला अटक करण्यात यश मिळाले आहे. सध्या शाहरुख खानची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. दिल्ली पोलिसांकडून लवकरच पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात माहिती देण्यात येईल.