शामली : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशातील शामलीमध्ये रेल्वे पोलिसांनी एका पत्रकाराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीय. एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. रेल्वे पोलिसांवर पत्रकाराला बेदम मारहाणीचा आरोप आहेच. शिवाय पत्रकाराचा कॅमेराही त्यांनी तोडला. रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर आपलं कर्तव्य पार पाडत हा पत्रकार घटनास्थळी घटनेचं वार्तांकन करण्यासाठी दाखल झाला होता. तेव्हाच रेल्वे पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीआरपीच्या जवानांनी केवळ मारहाणच केली नाही तर आपले कपडेही फाडले... तसंच मूत्रही पाजलं, असा धक्कादायक आरोप पत्रकारानं रेल्वे पोलिसांवर केलाय. 



व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आल्यानंतर रेल्वे पोलिसांच्या एसएचओ आणि कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलंय. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता मुरादाबादच्या जीआरपी एसपींना घटनास्थळी उपस्थित होण्याचे तसेच पुढच्या २४ तासांत घटनेचा अहवाल सादर करण्याचे  आदेश देण्यात आलेत.


मिळालेल्या माहितीनुसार, शामलीचे जीआरपीचे एसएचओ राकेश कुमार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली. जीआरपी पोलिसांनी एसएचओसमोरच आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप पत्रकारानं केलाय. त्यानंतर पत्रकाराला तुरुंगात बंद करून कपडे काढून मारहाण करण्यात आली. 



रेल्वे रुळावरून घसरल्याचं समजताच आपण घटनेचं वार्तांकन करण्यासाठी घटनास्थळी पोहचल्याचं पत्रकाराचं म्हणणं आहे. कॅमेरा सुरू असतानाच एसओ राकेश कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पत्रकाराला वार्तांकन करण्यास रोखलं. पत्रकारानं वार्तांकन रोखण्यास नकार दिल्यानंतर राकेश कुमार यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्रकाराला अट्टल गुन्हेगारापेक्षाही वाईट वागणूक दिली.