अहमदाबाद : भाजपच्या गुजरात राज्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच पक्षाला जोरदार झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री शंकर सिंग वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंग वाघेला यांनी गुरुवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली. याचवर्षी जुलै महिन्यात महेंद्र यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तीन महिन्यात त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंग वाघेला यांनी भाजपला अखेरचा हात दाखवला. राज्यामध्ये क्षत्रिय समाजाचे वजनदार नेते म्हणून शंकरसिंग वाघेला यांचा दबदबा असून त्यांनी भाजपविरोधात मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, महेंद्र यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, आपण आता वडिलांना मदत करणार आहे.



काँग्रेसला दे धक्का देत महेंद्र यांना गुजरातचे अर्थमंत्री नितिन पटेल आणि भाजप नेते जीतू वाघाणी यांनी भाजपमध्ये सामील केले होते. त्यानंतर शंकरसिंग वाघेला यांनी महेंद्र यांच्या भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी महेंद्र काँग्रेसचे आमदार होते. महेंद्र यांच्या काँग्रेस त्यागानंतर डझनभर कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडला होता. पुत्राच्या भाजप प्रवेशावर नाराज झालेल्या शंकरसिंग वाघेला यांनी मुलाने जर निर्णय बदलला नाही तर त्याच्याबरोबर कायमचे नाते तोडणार, अशी धमकीही दिली होती.