देशाच्या पंतप्रधानाने युद्धनौकेने फिरण्यात गैर काय?- शरद पवार
या युद्धनौका सतत फिरत असतात.
सातारा: राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपाचे गुरुवारी राजकीय वर्तुळात अनेक पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी ही भाषा शोभत नसल्याचे म्हटले. तसेच देशाच्या पंतप्रधानाने युद्धनौकेने फिरण्यात गैर काय आहे, असा सवाल पवारांनी मोदींना विचारला. मी स्वतः संरक्षण मंत्री होतो. त्यावेळी मी सुद्धा युद्धनौकांनी अंदमानला गेलो होतो. या युद्धनौका सतत फिरत असतात. यात जर देशाचा पंतप्रधान युद्धनौकांनी फिरत असेल तर त्यात गैर काय आहे? उलट अशा दौऱ्यांमुळे युद्धनौकांवरची नेमकी कार्यपद्धती काय, याचा अभ्यास होतो, असे पवारांनी सांगितले.
शरद पवार गुरुवारी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींच्या विधानाचा निषेध केला. गांधी परिवाराने देशाला दोन पंतप्रधान दिले. दोघांचीही हत्या झाली. एवढा मोठा त्याग या परिवाराने केल्यानंतर नरेंद्र मोदींची अशी भाषा शोभणारी नाही. आपण पंतप्रधानपदावर आहोत. या पदावर असताना अधिक काळजी घेणे आवश्यक असते. मात्र, अशी काळजी न घेता अशा प्रकारची भाषा मोदींकडून बोलली जात आहे, हे दुर्दैवी असल्याचे यावेळी पवारांनी सांगितले.
तत्पूर्वी माजी नौदलप्रमुख एल. रामदास यांनीही तत्कालीन घटनाक्रमाची तपशीलवार माहिती असलेले एक पत्रक प्रसिद्ध करून नरेंद्र मोदींचे सर्व आरोप फेटाळून लावले. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला नाही. अधिकृत शासकीय दौऱ्याच्यानिमित्ताने त्यांनी आयएनएस विराटवरून प्रवास केला होता. यावेळी त्यांच्यासोबत पत्नीशिवाय कुटुंबातील अन्य कुणीही सदस्य नव्हता, असे एल. रामदास यांनी स्पष्ट केले.