नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे २ अटी ठेवल्या होत्या. भाजपच्या सूत्रांनी ही माहिती दिल्याची बातमी आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली आहे. भाजपसोबत जाण्यासाठी नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळेंना कृषीमंत्री करावं आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री द्यावा, अशी मागणी पवारांनी मोदींपुढे ठेवली होती. मोदींनी मात्र या दोन्ही अटी मान्य केल्या नाहीत, असं भाजपच्या सूत्रांचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांची कृषीमंत्रीपदाची मागणी मान्य केली असती, तर भाजपचा बिहारमधला मित्रपक्ष असलेला जेडीयू रेल्वेमंत्री पदाची मागणी करेल. यामुळे भाजपला केंद्रात दोन महत्त्वाची खाती गमवावी लागली असती, असं भाजपच्या नेत्याने आयएएनएसला सांगितलं.


देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी दुसरा मुख्यमंत्री करण्याची पवारांची मागणी भाजपकडून कधीच स्वीकारली गेली नसती. कारण फडणवीस यांनी वाद आणि आरोपांशिवाय यशस्वीरित्या ५ वर्ष पूर्ण केली होती. तसंच पक्षानं प्रचारामध्ये फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं स्पष्ट केलं होतं. निकाल लागल्यानंतर २४ ऑक्टोबरला पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना मोदींनीही फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे शरद पवारांची मागणी मान्य करणं अशक्य होतं, असं भाजप नेता म्हणाला.


शरद पवार यांनी आपल्या मागण्यांबाबतचा संदेश भाजप, मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिला होता. यामुळेच निकाल लागल्यानंतर पवारांनी भाजपविरोधात आक्रमक वक्तव्य केली नाहीत. भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पवारांनी संसदेत मोदींशी ४५-५० मिनिटं चर्चा केली, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्याने दिली.


२० नोव्हेंबरला मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. यानंतर लगेचच २२ नोव्हेंबरला अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला. यानंतर लगेचच २३ तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपला पाठिंबा देताना अजित पवारांना ३०-३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं गेलं, पण ३ दिवसांमध्येच अजित पवारांचं बंड थंड झालं. अजित पवारांची ही भूमिका त्यांचं वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला पाठिंबा नाही, असं ट्विट शरद पवारांनी केलं.


'शरद पवार यांच्या मागणीबाबत संघामध्येही चर्चा होती. शेतकऱ्यांचा प्रश्न हा महाराष्ट्रात मोठा आहे, त्यामुळे कृषीमंत्रीपद राष्ट्रवादीला फायद्याचं ठरलं असतं. याआधीही पवारांनी केंद्रात कृषीमंत्रीपद भुषवलं आहे. तसंच फडणवीस यांना मोदींची पसंती होती, त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्नच नव्हता. भाजपकडून दोन्ही मागण्या मान्य होत नसल्यामुळे शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला,' असं नागपूरमधले संघ विचारक दिलीप देवधर म्हणाले.