मुंबई : शेअर बाजारात सलग चार दिवस नोंदवण्यात आलेल्या तेजीनंतर मंगळवारी घसरण पहायला मिळाली. जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसतो. महत्वाची बाब म्हणजे, चांगल्या निकालानंतर काही स्टॉक गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून योग्य पातळीवर आहेत. ब्रोकरेज हाऊसनेही अशा शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे तेल आणि गॅस सेक्टरचा इंडियन ऑइल (Indian Oil). IOCL या सरकारी कंपनीने अलीकडेच एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जारी केले आहेत. 100 रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या स्टॉकवर ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) ने हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजच्या मते, मजबूत  ग्रॉस रिफायनिंग मार्जिननुसार Q1FY23 निकाल अंदाजापेक्षा जास्त चांगले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IOCL : 100  रुपयांचा टार्गेट प्राइज


ब्रोकरेज रिसर्च फर्म मोतीलाल ओसवालने IOCL या सरकारी कंपनीचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर, गुंतवणूकीनंतर प्रति शेअर टार्गेट प्राइज 100 रुपये देण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2022 ला हा स्टॉक 71 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता. म्हणून सध्याच्या किंमतीनुसार गुंतवणूकदाराला जवळजवळ 41 टक्के परतावा मिळू शकतो. 


ब्रोकरेजच्या मते,  IOCL च्या विकासाला गती देण्यासाठी IOCL पुढील तीन वर्षांत वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू करण्याची तयारी करत आहे. लवकरच अनेक रिफायनरी कमिशन येऊ शकतात. पानिपत रिफायनरी सप्टेंबर 2024 पर्यंत, गुजरात रिफायनरी ऑगस्ट 2023 पर्यंत आणि बरौनी रिफायनरी एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण होऊ शकते. या प्रोजेक्टच्या पुढील अग्रेसिव्ह मार्गदर्शनाकडे पाहता, कंपनी FY23/24E साठी 6-7 टक्के ROCE सह 25,000 कोटी रुपयांचे कॅपेक्स करू शकते.


इंडियन ऑइलचे परिणाम कसे होते?



इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ला एप्रिल-जून 2022 या तिमाहीत 1992.53 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तर, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 5,941.37 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 


गेल्या दोन वर्षांत प्रथमच, कंपनीला तोटा झाला आहे कारण देशांतर्गत बाजारात उत्पादन खर्चात वाढ होऊनही सवलतीत तेल विकावं लागलं आहे. Q1FY23 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या कामकाजातील महसूल 62.5 टक्क्यांनी वाढून 2,51,932.89 कोटी रुपये झाला आहे. 


(Disclaimer : येथे गुंतवणुकीचा सल्ला ब्रोकरेज हाऊसने दिला आहे. ही झी मीडियाची मते नाहीत. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया तुमच्या एक्सपर्टचा सल्ला घ्या.)