नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन भाजपला आपल्याच नेत्यांनी घरचा आहेर देण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थव्यवस्थेवरुन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सरकार आणि अरुण जेटलींवर टीका केली. त्यानंतर आता भाजपच्या आणखीन एका खासदाराने भाजपला अडचणीत आणलं आहे.


बिहारमधील खासदार आणि अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी यशवंत सिन्हा यांची पाठराखण केली आहे. या संदर्भात शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत यशवंत सिन्हांची पाठराखण केली आहे.


शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत म्हटलं की, आता या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच समोर येत उत्तर दिलं पाहिजे. पंतप्रधानांनी पत्रकार परिषद बोलावून माहिती द्यायला हवी. त्यामुळे सामान्यांची त्यांना किती काळजी आहे हे कळेल.



अरुण जेटली विरुद्ध यशवंत सिन्हा असा हा मुद्दा बनला नाही पाहिजे असंही स्पष्टीकरण शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलं आहे.



त्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी यशवंत सिन्हांचं समर्थन केलं होतं. त्यांनी म्हटलं की, यशवंत सिन्हा यांनी सरकारला आरसा दाखवला आहे. सत्य जरी कटू असले तरी ते राष्ट्रहिताचे आहे. पण, हे सत्य म्हणजे बंडखोरी नाही.