नवी दिल्ली : भाजपचे बंडखोर नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. शत्रुघ्न सिन्हा पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. मात्र भाजपमध्ये राहूनही त्यांनी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली. बंडखोरी केल्यामुळंच यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापण्यात आले. पाटणा साहिबमधून शत्रुघ्न सिन्हांऐवजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसमध्ये ६ एप्रिल रोजी प्रवेश करणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. बिहारमधील पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार सिन्हा यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत अनेक तर्क लावले जात होते. मात्र, राहुल गांधी यांच्या भेटीनंतर पाडव्याच्या मुहुर्तावर सीमोल्लंघन करणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. 


लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी सिन्हा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी गेले होते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाजपच्या तिकिटावरून पाटणा साहिब मतदारसंघातून विजयी झालेल्या सिन्हा यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी आहे. त्यासाठी ते आग्रही आहेत. परंतु, काँग्रेसकडून सिन्हा यांना स्पष्टपणे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही, अशी माहिती पुढे आली आहे.