लखनऊ: भाजपला रामराम करून काँग्रेसवासी झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी आल्याआल्याच स्वपक्षीयांना अडचणीत आणले आहे. आपल्या पत्नीसाठी लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार केल्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसी संस्कृतीला न रुचणारे वक्तव्य केले आहे. देशाचा पंतप्रधान हा अखिलेश यादव किंवा मायावती यांच्यासारखा असावा, असे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर म्हटले. त्यामुळे राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्या काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले की, अखिलेश यादव यांच्यात खूप क्षमता आहे, ते युवाशक्तीचे प्रतीक आहेत. मी त्यांच्याकडे केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर देशाचे भविष्य म्हणून पाहतो. मला ते पंतप्रधानपदाचे दावेदार वाटतात, असे सिन्हा यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपमध्ये असतानाही शत्रुघ्न सिन्हा स्वपक्षीयांना आहेर देण्याच्या वृत्तीमुळेच जास्त चर्चेत राहिले होते. एखादा चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मला साधे कॅबिनेट मंत्रीपदही मिळू शकत नाही का, असा सवाल करत त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले होते. त्यामुळे सिन्हा यांचा बेधकडपणा पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा काँग्रेसचा अंदाज होता. परंतु, सिन्हा यांची सध्याची वाटचाल पाहता ते सध्या काँग्रेससाठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 


शत्रुघ्न सिन्हांकडून पत्नीसाठी लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचा प्रचार; काँग्रेस नाराज


काँग्रेसचे लखनऊमधील उमेदवार प्रमोद कृष्णन यांनीही शत्रुघ्न सिन्हांना पक्षधर्माची आठवण करून दिली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी लखनऊमध्ये येऊन पतीधर्माचे पालन केले. मात्र, आता त्यांनी एक दिवस तरी माझ्या प्रचारासाठी येऊन पक्षधर्माचे पालनही करावे, असे कृष्णन यांनी सांगितले. यावर आता शत्रुघ्न सिन्हा काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.