`वन मॅन शो` आणि `टू मॅन आर्मी`चा खेळ खल्लास; शत्रुघ्न सिन्हांचा मोदी-शहांना टोला
`खामोश, झारखंड बीजेपी.... टाटा, बाय-बाय!
पाटणा: झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाल्यानंतर विरोधकांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यावरून काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ट्विट करून निशाणा साधला आहे. 'वन मॅन शो आणि टू मेन आर्मी', तुमचा खेळ संपला आहे. 'खामोश, झारखंड बीजेपी.... टाटा, बाय-बाय!', असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
तसेच आता दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्येही हेच पाहायला मिळेल, असा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. या ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी झारखंडमधील विजयाबद्दल काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत.
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर, दुसरीकडे रघुबर दास यांना पराभवाचा धक्का बसला. अपक्ष उमेदवार सरयू राय यांनी त्यांना मात दिली.
हाच धागा पकडत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात शत्रुघ्न सिन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. भाजपमध्ये असताना त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या धोरणांवर जाहीरपणे टीकास्त्र सोडले होते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर मला साधे मंत्रिपद मिळू शकत नाही का, असा सवाल विचारत त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपमधील अनेकजण त्यांच्यावर नाराज होते. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी आपला आक्रमकपणा कायम ठेवला होता. यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट नाकारले होते. यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती.