शीला दीक्षित पंचत्वात विलीन
शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
शीला दीक्षित यांचे शनिवारी दिल्लीतल्या एस्कॉर्ट रुग्णालयात वयाच्या ८१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलग १५ वर्षांच्या दिल्ली मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दीक्षित यांचा शहराच्या विकासामध्ये मोठा वाटा राहिला.
काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सरकारतर्फे आणि दिल्लीमध्ये २ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.