शिवसेनेचा अमेरिकेच्या ट्रम्प सरकारवर निशाणा
शिवसेनेने आपले मुखपत्र हिंदी सामनातून अमेरिकेच्या ट्रम्प सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई : शिवसेनेने आपले मुखपत्र हिंदी सामनातून अमेरिकेच्या ट्रम्प सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात धर्माच्या नावाखाली हिंसा वाढत असल्याचा अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिला. यावरुन शिवसेनेने अमेरिकेला लक्ष्य केले आहे. अमेरिकेने हिंदी सामनाच्या अग्रलेखाचे 'शिर्षक अमेरिकी चुगलखोरी' असे दिले आहे. भारतात धर्माच्या नावाखाली हिंसा वाढली असून हिंदू संघटना अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांवर हल्ले करत असल्याचा 'शोध' अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने लावला आहे. हे हल्ले रोखण्यास मोदी सरकार अपयशी ठरल्याचे तुणतुणेही अमेरिकेने वाजवल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
अमेरिकेत सरकार कोणाचेही असे पण ते जगाचे स्वयंघोषित 'पालनकर्ते' असतात. आम्हीच एकमेव वैश्विक महासत्ता असून पूर्ण जगाची ठेकेदारी केवळ आमच्याकडे आहे, असे प्रत्येक अमेरिकन सत्ताधाऱ्याला वाटते. म्हणूनच अल्पसंख्यांक आणि मुस्लिमांच्या सुरक्षेवर ट्रम्प सरकारच्या परराष्ट्र खाते बैचेनी वाढली असावी. यामध्ये अनपेक्षित असे काही नसल्याचेही यात म्हटले आहे.
याआधी गोमांस ठेवण्याच्या शंकेवरून आमच्या देशात जे प्रकरण झाले त्यावर अमेरिकेने मगरीचे अश्रू ढाळले आणि भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आता देखील धर्म आणि गोरक्षेच्या मुद्द्यावरून हिंदु संघटनांच्या मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांवर सामूहीक हल्ल्यात वाढ झाली असे अहवालात म्हटले. 'इंटरनॅशनल रिलिजियस फ्रिडम इंडीया- 2018' नावाचा अहवाल अमेरिकी परराष्ट् मंत्रालयाने जारी केला आहे. 2015 ते 2017 दरम्यान भारतात जातीय हिंसा 9 टक्क्यांनी वाढल्या आणि 822 घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.