राड्यानंतर शिवसेना-भाजपकडून आपापल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
कल्याणामध्ये काल शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेल्या राजकीय धुरळ्याची धग अद्याप ताजी आहे.
आतिश भोईर, कल्याण : कल्याणामध्ये काल शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेल्या राजकीय धुरळ्याची धग अद्याप ताजी आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटणाऱ्या आपापल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्याचे जोरदार पडसाद काल कल्याणात पहायला मिळाले. यावेळी भाजप शहर कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडून तर शिवसेनेच्या या तोडफोडीचा एकहाती विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा भाजपने आज सत्कार केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर काल संपूर्ण महाराष्ट्रासह कल्याणातही जोरदार पडसाद उमटलेले दिसून आले. कल्याणात तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट भाजप शहर कार्यालयावर चालून जात दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्यासह त्याला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. यावेळी शिवसेनेचे अमोल गायकवाड यांनी आपल्या हातानेच कार्यालयाची काच फोडली. याबद्दल शिवसेनेच्या कल्याण शहर मध्यवर्ती शाखेत अमोल गायकवाड यांचा महानगरप्रमुख विजय साळवी, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे आदी सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
दरम्यान शिवसेनेच्या या हल्ल्याचा भाजपच्या केवळ 2 पदाधिकाऱ्यांनी ठामपणे विरोध केला. त्याबद्दल भाजप कल्याण जिल्हा कार्यलयात प्रताप टुमकर आणि वैभव सावंत या दोघांचा भाजपातर्फे आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.