नवी दिल्ली : मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, केडीएमसी महानगरपालिकेसह सर्व महापालिकेत शिवसेना (ShivSena) ताकदीने लढेल आणि जिंकेल. आणि मुंबई महापालिकेवरचा (Mumbai Municipal) भगवा झेंडा कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणसाविरुद्ध कितीही कटकारस्थानं केली, तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोऊन आम्ही मुंबई मनपा जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा घणाघात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मेरिटमध्ये आली म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. ज्या राज्याचं नेतृत्व शिवसेना करतेय , याचा अर्थ शिवसेनेमध्ये निर्णय घेण्याची उत्तम क्षमता आहे. राज्यातील लोकांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सलग तीनवेळा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत टॉपवर आलेले आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  भेटीगाठी होत असतात आम्हीपण अनेक नेत्यांना भेटत असतो. प्रत्येक भेटीमागे राजकारण असतं असं नाही. मनसे-भाजपची युती होईल याविषयी बोलण्यासारखं फार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


गोव्यात पणजी मतदारसंघातील मतदारांच्या मागे आधी ईडी लावा. उत्तर प्रदेशमध्ये, पश्चिम बंगालमधल्याही काही मतदारसंघात ईडी लावायला हवी. चंद्रकांत पाटील यांनी फार चांगली सुचना केली आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या लढाईत उभे राहू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.