शिवसेनेला आणखी एक मंत्रीपद द्यायला हवे होते- संजय राऊत
शिवसेना रेल्वे खात्यासाठी आग्रही आहे.
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ शपविधीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा रुसवेफुगवे सुरु झाल्याची चर्चा होती. त्यामुळे २०१४ प्रमाणे यंदाही सत्तास्थापनेपासूनच दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपप्रमाणे शिवसेनेलाही घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे यंदा सत्तेत मोठा वाटा मिळावा, अशी शिवसेनेची अपेक्षा होती. त्यासाठी शिवसेनेकडून भाजपसमोर तीन मंत्रिपदे, राज्यपाल पद आणि उपसभापती अशा पाच पदांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
मात्र, आज सकाळपासून समोर येत असलेल्या माहितीनुसार एनडीएच्या घटकपक्षांतील प्रत्येकी एका खासदारालाच मंत्रिपदाची शपथ देण्यात येईल. त्यासाठी शिवसेनेकडून अरविंद सावंत यांचे नावही निश्चित झाले होते. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याच्या चर्चेने जोर धरला होता.
मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या सर्व चर्चा निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले की, भाजपकडे बहुमत असल्याने त्यांचे मंत्री जास्त आहेत. कारण, राजकारण भावनिकतेवर चालत नाही. शिवसेनेला ग्रामीण भागात आणखी एक मंत्रीपद द्यायला पाहिजे होते. मात्र, अरविंद सावंत हेदेखील अनुभवी नेते आहेत. त्यामुळे उद्धवजींनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही सगळे एकत्रच आहोत. शिवसेनेत कोणीही नाराज नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला उर्जा, अवजड उद्योग आणि नागरी उड्डाण या तीनपैकी एखादे खाते मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेना रेल्वे खात्यासाठी आग्रही आहे. परंतु, नितीश कुमार यांनीही रेल्वे खात्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी व अमित शहा काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.