`छत्रपती शिवाजी महाराज यांनीही औरंगजेबाला 5 वेळा पत्र लिहीले`; सावरकरांचा बचाव करताना भाजप नेत्याचे वक्तव्य
chhatrapati shivaji maharaj : मला तुमचे सेवक व्हायचे आहे असे मी नाही सावरकरांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे, असा उल्लेख राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता.
Political News : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra in Maharashtra), एका सभेत बोलताना वीर सावरकर (Veer Savrkar) यांनी माफीसाठी ब्रिटिशांकडे पत्र पाठवले असा आरोप केला होता. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन देशभरात वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रात भाजपने (BJP) राहुल गांधी यांच्याविरोधात तीव्र आंदोलने केली. सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (ranjit savarkar) यांनी राहुल गांधी यांना अटक करण्याची मागणी करत त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत.
अशातच भाजप नेत्याने केलेल्या वक्तव्यांनी नवा वाद उफाळून आलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही (chhatrapati shivaji maharaj) औरंगजेबाला (aurangzeb) पाच वेळा पत्र पाठवले होते असे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी (sudhanshu trivedi) यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी सावरकरांच्या एका पत्राचा उल्लेख करत, मला तुमचे सेवक व्हायचे आहे असे मी नाही सावरकरांनी म्हटले. देवेंद्र फडणवीसांनीही हे पत्र पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती, असे म्हटले होते.
सावरकरांनी हे पत्र त्यावेळी तत्कालीन प्रस्तावित फॉरमॅटखाली लिहिले
सुधांशू त्रिवेदी एका वृत्तवाहिनीच्या चर्चा सत्रामध्ये सहभागी झाले होते. सावरकरांचा बचाव करताना ते म्हणाले. ते म्हणाले की, सावरकरांनी हे पत्र त्यावेळी तत्कालीन प्रस्तावित फॉरमॅटखाली लिहिले होते. मग काय त्यांनी ब्रिटिश राज्यघटनेची शपथ घेतली होती का? नाही ना. त्यामुळे पत्रात काहीही लिहिलं तरी ते याच ओळीने संपलं जात असे. म्हणूनच जेव्हा इंग्रजांशी पत्रव्यवहार करायचा असे तेव्हा सावरकरच नव्हे, तर गांधीही या ओळीने पत्र संपवत असत. सुधांशू त्रिवेदी असेही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की, ज्यावेळी ज्याची सत्ता असते, त्यावेळी त्यांनी सुचवलेल्या नियमांनुसारच पत्रव्यवहार करावा लागतो. उदाहरण देताना त्रिवेदी म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाशी पत्रव्यवहार करायचा होता, त्यामुळे त्यांनाही औरंगजेबाच्या राजवटीत ज्या पद्धतीने पत्रव्यवहार केला जात होता त्याच पद्धतीने तो करावा लागला."
'तुमचा नोकर...' सावरकरांचं हे पत्र देवेंद्र फडणवीसांनीही पाहावं म्हणत राहुल गांधींची टीका
काय म्हणाले सुधांशू त्रिवेदी?
"राहुल गांधी यांनी माफी मागण्याबाबत भाष्य केले आहे. त्यावेळी बाहेर पडण्यासाठी अनेक जण त्या फॉरमॅटनुसार माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला पाच वेळा पत्र लिहीले होते. त्यामुळे त्यांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तर घेतली नाही ना," असे सुधांशू त्रिवेदी म्हणाले.