नवी दिल्ली : Shivamogga:वीर सावरकर यांच्या पोस्टरवरुन कर्नाटकातील शिवमोगामध्ये तणाव निर्माण झाला आहे. शिवमोगामध्ये उद्यापर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच येथील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शांतता राखण्यासाठी पोलिसांनी तत्काळ 144 कलम लागू केले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्नाटकातील शिवमोग्गा येथे मोठा वाद निर्माण झाला. (Savarkar vs Tipu Sultan) शहरातील अमीर अहमद सर्कलवर वीर सावरकरांचा फोटो लावला, काही वेळाने टिपू सुलतान समर्थकांनी हे सावकर यांचे पोस्टर काढण्याचा प्रयत्न केला. यावरुन दोन गटांत जोरदार वादावादी झाली, त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी येथे जमाव करणाऱ्या तरुणांना हुसकावून लावले. मात्र, येथे तणावाची परिस्थिती कायम आहे. 


बॅनरवरुन दोन गटात हाणामारी


वीर सावरकरांच्या पोस्टरवरुन शिवमोग्गामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शांतता राखण्यासाठी पोलिसांनी तत्काळ 144 कलम लागू केले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, अमीर अहमद सर्कलमधील वादात दोन गट समोरासमोर आले आणि त्यांना पांगवण्यासाठी लोकांना लाठीमार करावा लागला. एक गट अद्यापही सर्कलमध्ये विरोध करत असून त्यांना तेथून हटवले जात आहे. शिवमोग्गा आणि भद्रावती येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. येथे गर्दी किंवा लोकांना जमण्यास परवानगी नाही. पुढील दोन दिवस दोन्ही भागात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


हल्ल्याचा प्रयत्न


दुसरीकडे, शिवमोग्गा येथे प्रेमसिंग नावाच्या 26 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शहरातील गांधी बाजार भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात हल्लेखोरांनी ही घटना घडवली आहे. जखमी प्रेमसिंग याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेमसिंग यांच्यावरील हल्ल्यामागचे कारण सावरकरांच्या चित्रावरुन झालेला वाद आहे की, या हल्ल्यामागे आणखी काही कारण आहे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. अमीर अहमद सर्कलपासून गांधी बाजारचे अंतर 3-4 किलोमीटर आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


जिल्ह्यात तणाव वाढल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र हेही शिवमोग्गा येथे रवाना झाले आहेत. शिवमोग्गा येथे चाकूने वार केल्याची घटना घडली आहे, मात्र सावरकरांच्या पोस्टरशी संबंधित आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र, चौकाचौकांतून सावरकरांचे बॅनर हटवल्याबद्दल हिंदू संघटना संतप्त आहेत. निदर्शन अधिक तीव्र करणार असल्याच्या चर्चा आहेत.