नवी दिल्ली : जम्मू अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शिवसेनेनं लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक नोटीस देऊन अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसंदर्भात संसदेत चर्चेची मागणी केलीय. सर्व कामं बाजुला ठेवून अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसंदर्भात तसंच सुरक्षा यंत्रणांचं हे अपयश आहे का? यासंदर्भात चर्चा करण्यात मागणी करत खैरे यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. 


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. देशात कथित गोरक्षकांकडून होत असलेला हिंसाचार, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला, दार्जिलिंगमधील हिंसा आणि चीनसोबत सुरू असलेला सीमावाद यांसहीत अनेक मुद्द्यावर आज संसदेत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांसमोर येणार आहेत. 


लोकसभा आणि राज्यसभेत १६ नवी विधेयकं सादर केली जाणार आहेत. त्यात जम्मू काश्मीर जीएसटी विधेयक आणि नागरिकता संशोधन विधेयक सामिल आहे. त्याचबरोबर दुसरीकडे चीनकडून सुरू असलेला सीमावादावर परराष्ट्र सचिव एस जयशंकर संसदीय समितीला माहिती देणार आहेत. काँग्रेस नेता शशि थरून या संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत तर राहुल गांधी सदस्य आहेत.