भोपाळ : मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रीपद पुन्हा एकजा शिवराजसिंह चौहान यांच्याकडे येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराजसिंह चौहान यांची आज विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. विधिमंडळ पक्ष निवडीनंतर संध्याकाळी त्यांचा शपथविधी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या संकटामुळे शिवराजसिंह चौहान आज सायंकाळी चौथ्यांदा साधेपणाने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. शपथविधीची तयारी राजभवनात सुरू झाली आहे. त्यांच्यासोबत मिनी कॅबिनेटची देखील शपथविधी होणार आहे. या शपथविधीत मोजक्या लोकांना बोलवण्यात आलं आहे.


शिवराजसिंह चौहान यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर ते चौथ्यांदा मध्यप्रदेशची सूत्रे स्वीकारतील. 29 नोव्हेंबर 2005 रोजी ते पहिल्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 12 डिसेंबर 2008 रोजी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. 8 डिसेंबर 2013 ला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.



कमलनाथ यांचे सरकार का पडले


काँग्रेसच्या २२ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कमलनाथ सरकार पडलं. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामा दिला होता, ज्यामध्ये 6 मंत्र्यांचा देखील समावेश होता. आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आलं. पण फ्लोअर टेस्टला सामोरे न जाता त्यांनी मंत्रिमंडळ बरखास्त करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.


फ्लोर टेस्ट होईल अशी अपेक्षा असताना विधीमंडळाच्या अध्यक्षांनी कामकाज तबकूब केलं होतं. पण त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. कमलनाथ सरकारला तातडीने फ्लोर टेस्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. आदेशानंतर सभापतींनी सर्व 16 आमदारांचा राजीनामा मंजूर केला आणि फ्लोअर टेस्टपूर्वी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.