टीव्हीवर कॉमेडी शो विथ कपिल शर्मा आणि मोबाईलवर, या नेत्याने घेतली कुणाची फिरकी?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तराखंडमध्ये प्रचारात सहभागी होताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
भोपाळ : पाच राज्यात विधानसभा निवडणूका होत आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तराखंडमध्ये प्रचारात सहभागी होताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
भाजपने उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवडणूक रॅलीचे आयोजन केलंय. यावेळी त्यांची वेगळी स्टाइल पाहायला मिळत आहे. उत्तराखंडमधील निवडणूक रॅलीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. देशात दोन कॉमेडी शो सुरू आहेत. कॉमेडी विथ कपिल शर्मा टीव्हीवर. दुसरे, मोबाईलवर कॉमेडी विथ राहुल, अशी टीका त्यांनी केलीय.
राहुलबाबा काहीही बोलत राहतात. त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. प्रत्येकजण त्यांना मनोरंजनासाठी घेतो. देशात सध्या दोनच कॉमेडी शो सुरू आहेत. एक टीव्हीवर कॉमेडी विथ कपिल. कपिल शर्माला तुम्ही ओळखतच असाल. पण, दुसरा शो पाहिला की नाही?? दुसरी कॉमेडी विथ राहुल ऑन मोबाईल. भाऊ काहीही बोलत राहतो.
हिंदू आणि हिंदुत्व वेगळे आहेत असं ते म्हणतात. पण, राहुल बाबा तुमचे मानसिक वय ६ वर्षांपेक्षा जास्त नाही. तुम्हाला हिंदू आणि हिंदुत्व काय माहीत, असा सवाल त्यांनी या प्रचारादरम्यान केला.