मुंबई : भाजपचा मित्रपक्ष शिवसेना कमालीची नाराज झाली आहे. शिवसेनेला केंद्रात किमान तीन मंत्रीपदे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एकच मंत्रीपद देऊन शिवसेनेची बोळवण करण्यात आली. त्यामुळे शिवसेना प्रचंड नाराज झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंत्रीपदाबाबत नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, शिवसेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी सूत्रांकडून 'झी २४ तास' माहिती मिळाली आहे. शिवसेनेला आणखी मंत्रीपद देण्याचा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला आहे. मात्र, राज्यमंत्री देण्याचा हा प्रस्ताव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३५२ जागा मिळाल्यात. तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्यात. एनडीएमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला केवळ एकच मंत्रीपद देण्यात आले. केंद्रातील खातेवाटपात अवजड उद्योग खाते देऊन शिवसेनेची बोळवण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, भाजपचा जुना मित्रपक्ष आणि दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष असल्याने यावेळी शिवसेनेला महत्वाचे खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा पुढे आली.


शिवसेना जराही नाराज नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. अवजड उद्योग खाते मिळाल्याने शिवसेना अजिबात नाराज झालेली नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला दिलेल्या खात्याबाबत आम्ही समाधानी आहोत, असेही ते म्हणाले होते. तसेच जो संदेश आम्हाला पंतप्रधानांना द्यायचा होता तो आम्ही दिलेला आहे. आम्ही किंचितही नाराज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, ही नाराजी लपून राहिलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला दुखवून चालणार नाही, असे भाजपला वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपकडून होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच शिवसेनेला केंद्रात राज्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे, अशी माहिती मिळत आहे.


केंद्रात खातेवाटपादरम्यान शिवसेनेला अवजड उद्योग मंत्रालय देण्यात आले. या पूर्वी शिवसेनेचे अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग खाते देण्यात आले होते. १८ खासदार असलेल्या शिवसेनेला केंद्रात केवळ एकच मंत्रीपद मिळाले आणि तेही अवजड उद्योग हे शिवसेनेचा अपेक्षाभंग करणारं आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातही रंगली आहे.