मुंबई :  अटलजींच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. साडेसहा वाजता भाजपातील मंत्री मंडळाची बैठक होणार आहे. साडेसात वाजता अटलजींच पार्थिव दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच काही वेळापूर्वी निधन झालं. एम्स रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले ३६ तास ते मृत्यूशी झुंज देत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहंकार, गर्व, सत्तेतून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलोन् मैल दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अटलजी तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. पण राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान-मोठ्या घटक दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आल्याचेही त्यांनी म्हटले. एका वडिलधाऱ्याच्या मायेने त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकारणाची प्रेरणा होती. शिवसेनाप्रमुखांशी असलेला त्यांचा स्नेह जगजाहीर होता, अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा होत असल्याच्या आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला.


देशाची प्रचंड हानी 


अटलजींच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिकेमुळे ‘एनडीए’ मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची, देशाची प्रचंड हानी झाली. शिवसेनाप्रमुखांनंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्तिमत्वास सांष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली दिली.  अटलजी, तुमच्यासारखे तुम्हीच. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.