अयोध्या : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज राम नगरी अयोध्येत पोहोचत आहेत. ते आपल्या यात्रे दरम्यान दुपारी 3 वाजता साधुसंतांना भेटणार आहेत तर संध्याकाळी 6 वाजता सरयू घाटावर होणाऱ्या आरतीत सहभागी होतील. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील सहभागी होतील. उद्या सकाळी 9 वाजता ते राम जन्मभूमिमध्ये जाऊन रामललाचे दर्शन घेतील. शिवसेनेच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन ट्रेनमधून शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत.


रविवारी विहिंपचा कार्यक्रम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिप) धर्मसभा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. शिवसेनेचा होणारा कार्यक्रम पाहता अयोध्येत तणावपूर्ण शांतता आहे. सर्व शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच मोठ्या संख्येत सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत.


अयोध्या तणावात 


सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणाची सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ढकलल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना राम मंदिराच्या मुद्यावरुन आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्तवादी संघटनांकडून अयोध्येत सभांचं आयोजन करण्यात येतं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आणि उद्या अयोध्येचा दौरा करणार आहेत.


या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणावपूर्ण स्थिती आहे. एखादी अनुचित घटना होण्याची भीती लोकांना सतावते आहे.


त्यामुळे अनेकांनी जीवनावश्यक वस्तू घरी आणून ठेवल्या आहेत. काही दिवस घरीच राहावं लागल्यास कोणतीही अडचण येऊ नये, याची तयारी स्थानिकांनी केली आहे.


वातावरण चिघळणार ?



 उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो शिवसैनिक अयोध्येला पोहोचले आहेत. याशिवाय विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. अयोध्येत अचानक झालेल्या गर्दीमुळे वातावरण तणावपूर्ण झालंय. शहरातील स्थिती बिघडण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.


त्यामुळे अनेकांनी घरात जीवनाश्यक वस्तू गोळा करण्यास सुरुवात केली आहे.


साधूसंतांसोबत चर्चा 


 उद्धव ठाकरे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील मातीचा कलश घेऊन अयोध्येला पोहोचत आहेत.


शिवनेरी किल्ल्यावरील मातीनं भरलेला कलश उद्धव ठाकरे राम जन्मभूमी स्थळावरील महंतांकडे सोपवतील. याशिवाय ते साधूसंतांसोबत राम मंदिराच्या उभारणीबद्दल चर्चा करणार आहेत.


अयोध्येत रामलल्लाचं दर्शन केल्यावर ते शरयूच्या काठावर पूजा करतील. या दौऱ्यासाठी शिवसेनेनं 'हर हिंदू की एकही पुकार, पहले मंदिर फिर सरकार,' अशी घोषणा दिलीयं.