रामराजे शिंदे, झी मीडिया दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत एकत्र आले की चर्चेचा विषय ठरतो. पण आज दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संजय राऊत. या भेटीमुळे नवे ठाकरे आणि गांधी पर्व सुरू होतेय का? असा प्रश्न अनेकांना पडलाय.


आदल्या दिवशी काय झालं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारचा दिवस उजाडण्याआधी म्हणजे सोमवारी रात्री संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट झाली. राहुल गांधी यांनी आपल्या निवासस्थानी संजय राऊत यांना बोलावून घेतलं होतं. गप्पा सुरू झाल्या. राहुल गांधीनी सुरूवात केली. 'आज मीडिया बहुत बायस हो गया है. आप मीडिया को कैसे हॅण्डल करते हो'. 


त्यावर संजय राऊत यांनी कोणत्याही काळात मीडिया बायस असतो. इंदिरा गांधी यांच्या काळातही असंच होतं. रामनाथ गोयंका यांनी स्वतंत्रपणे इंदिरा गांधी विरोधात लेखणी चालविली होती. तर इंदिरा गांधी यांनी त्यावेळी रामनाथ गोयंकाच्या 200 कार्यालयावर वेगवेगळ्या यंत्रणेकडून धाडी टाकल्या होत्या. रामनाथ गोयंकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही. उलट गोयंका आणखी निकरानं लढायला लागले. प्रत्येक सरकार विरोधात असंच लढावं लागतं.' संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना पत्रकारितेबद्दल काही धडे दिले.


याचा परिणामही झाला. राहुल गांधी संसदेत मीडीयापासून पळत होते. तेवढ्यात संजय राऊत यांनी सांगितलं, 'आप दो शब्द बोल दीजीए. वो आपकी राह देख रहे है. ऐसे चले जाना ठीक नहीं.' त्यानंतर राहुल गांधी मीडीयाशी बोलले. हा कालच्या बैठकीचा परिणाम होता. ती बैठक तब्बल दोन चालली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार' शिवसेनेची भूमिका या सर्वच गोष्टीवर गप्पा झाल्या.


गांधी मातोश्रीवर जाणार का ?


दरम्यान संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना राज्यात येण्याचं निमंत्रण दिलं. 'सत्ता आपली आहे, राज्यात कांग्रेस सत्तेत आहे, आणि तुम्ही एकदाही महाराष्ट्रात आला नाहीत. मी तुम्हाला निमंत्रण देतो आणि तुमच्यासाठी कार्यक्रम घेतो' यावर राहुल गांधींनी होकार दिला. या दौऱ्यात ते उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. पण राहुल गांधी मातोश्रीवर जाणार का, याकडे लक्ष लागलं आहे. 


गांधी घराण्यातील कोणीही आत्तापर्यंत मातोश्रीवर गेलं नाही. यापूर्वी एकदा इंदिरा गांधी मुंबईत आल्या होत्या. त्या मातोश्री जवळून जाणार होत्या. तेव्हा बाळासाहेब ठाकरे मातोश्री बाहेर आले होते आणि इंदिरा गांधी यांच्या गळ्यात हार घालून स्वागत केलं. परंतु इंदिरा गांधी मातोश्रीवर आल्या नाहीत. राहुल गांधी मातोश्रीवर गेले तर ठाकरे - गांधी घराण्यातील संबंध आणखी दृढ होतील आणि भाजपला सत्तेबाहेर ठेवणं शक्य होईल. 


'फटे लेकीन हटे नहीं'


'भाजप विरोधात शिवसेना कुठवर लढण्यास तयार आहे' राहुल गांधींनी प्रश्न केला. त्यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेनं एकदा निर्णय घेतला की तो तडीस नेते. आम्ही शिवसेनेबद्दल बोलताना म्हणतो, 'फटे लेकीन हटे नहीं.' यावर राहुल गांधी हसले... म्हणाले, इसका क्या मतलब है". 
राऊत म्हणाले, शिवसेना जेंव्हा जेंव्हा रस्त्यावर उतरते तेंव्हा तेंव्हा राडा होता. मग कपडे फाटू द्या...‘ आम्ही मागे हटत नाही'.


आज सकाळी कॅान्स्टीटयुशन क्लबमध्ये ब्रेकफास्टसाठी सर्वांना बोलवल्यावर राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना बाजूच्या खुर्चीवर बसवलं. नंतर लगेच राहुल गांधी यांनी संजय राऊतांना भाषण करायला सांगितलं. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, खरंतर मोदी यांनी चहापानाला बोलवालयाला पाहीजे होतं. पण ते पाणी सुद्धा पाजत नाहीत.' त्यापुढे जाऊन राऊत म्हणाले, सर्वांनी एकत्र राहून भाजपला विरोध करायला पाहिजे. मी काल राहुल गांधी यांना सांगितलं. तेवढ्यात राहुल गांधी मागून म्हणाले, "फटे लेकीन हटे नही". राऊत सुद्धा होकार देत.. "मी राहुलजी ना हेच म्हणालो, फटे लेकीन हटे नहीं. अशीच भूमिका सर्व विरोधी पक्षांनी ठेवून लढायला पाहीजे. तरच 2024 मध्ये भाजपचा पराभव करता येईल."


हे भाषण झाल्यानंतर संजय राऊत बाहेर पडले. तेवढ्यात राहुल गांधी आले. संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि संजयजी और थोडी देर रूकीए' अशी विनंती केली. नेमका तेच बोलतानाचा आणि खांद्यावर हात टाकलेला फोटो दिवसभर सोशल मीडियावर फिरतोय. त्यानंतर संजय राऊत पुन्हा मीटींगमध्ये गेले.


शिवसेनेशी जवळीक का...?


विरोधकांमध्ये काँग्रेस, टीएमसी नंतर सर्वात जास्त खासदार असलेला शिवसेना पक्ष आहे. शिवसेनेची मोठी वोट बॅंक आहे. ही वोट बॅंक आपल्या पाठीशी ठेवण्याची खेळी काँग्रेस करतेय. त्याशिवाय सॅाफ्ट हिंदुत्वाचा संदेशही द्यायचाय. दुसरीकडे राहुल गांधींना विरोधी पक्षाचं नेतृत्व करायचे आहे. तेंव्हा ममता बॅनर्जी आणि शरद पवार या दोघांनाही आपल्या पाठीशी सर्व विरोधक आणि शिवसेनाही आहे हा संदेश द्यायचाय. त्यामुळे शिवसेनेला सोबत ठेवणं गरजेचं आहे. ब्रेकफास्ट डिप्लोमसी करून...
 
शिवसेनेला सोबत घेऊन, सायकलवरून रॅली काढून, राहुल गांधींनी आजचा दिवस गाजवला. यापूर्वीही ट्रॅक्टर वरून रॅली काढली होती. हाच वेग सातत्यानं राहुल गांधींना पुढे ठेवावा लागणार आहे. परंतु स्वतः:चा पक्ष सांभाळताना मित्रपक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे राहुल गांधी यांनी ओळखलं आहे. अमित शाह आणि मोदी यांनी मित्रपक्षाला जुमानलं नाही. म्हणून अकाली दल, शिवसेना दूर गेले. ती चूक राहुल गांधी करू इच्छित नाही. 


संजय राऊत यांनी शिवसेना कशी चालते यावर बोलताना राहुल गांधी यांना सांगितलं की, "आमच्या पक्षात एकमेकांवर विश्वास ठेवतो. तोच धागा आम्हाला मजबूत करतो. त्यामुळे कोणाशीही लढताना आम्ही एकत्र असतो."


आता राहुल गांधी या नवीन मित्राचा विश्वास कमावण्यासाठी मातोश्रीवर जाणार का? हा प्रश्न आहे. जर राहुल गांधी मातोश्रीवर गेले तर मात्र ठाकरे आणि गांधी घराण्याचा नवा अध्याय सुरू होईल, यात शंका नाही.