मुंबई : loksabha election 2019 सातव्या टप्प्यातील मतदान पार पडण्यासोबतच देशभरात घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल हाती आले. एकिकडे एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा भाजप सत्तेत येण्याची चिन्हं आहेत. तर दुसरीकडे मात्र निकालानंतरच्या मोर्चेबांधणीसाठी चंद्राबाबू नायडू सध्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्राबाबूंच्या याच भेट सत्रावर शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून टीका करण्यात आली आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट चाव्या वापरून दिल्लीचं दार उघडण्यासाठी विरोधी पक्षनेते कामाला लागले आहेत. याच मोहिमेचं नेतृत्व खुद्द चंद्राबाबू करत असल्याचं अग्रलेखातून म्हटलं आहे. 'अनेक कुबड्यांच्या आधारे सरपटणारे पंगू सरकार देशाला परवडणार नाही, असं थेट शब्दांत या अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे. महाआघाडीत पंतप्रधानपदाचे किमान पाच उमेदवार आहेत. या पाचही जणांना धक्का बसण्याचीच चिन्हं जास्त दिसत असल्याचं सूचक विधानही करण्यात आलं आहे. 'अमित शाह यांचा आत्मविश्वास सांगतोय की, भाजपा स्वबळावर ३०० जागा जिंकेल आणि तो टप्पा त्यांनी निवडणुकीच्या पाचव्या चरणातच पार केला..' त्यातही योगी आदित्यनाथ यांनी ‘अब की बार ४०० पार’ची खात्री दिली होती. त्यामुळे हे एकंदर वातावरण पाहता चंद्राबाबू स्वतःची दमछाक का करून घेत आहेत? असा प्रश्नही शिवसेनेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे. 


देशाच्या राजकीय पटलावर महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या नेतेमंडळींची भेट घेणाऱ्या चंद्राबाबूंचा सध्याचा उत्साह गुरुवार संध्याकाळपर्यंत टिकून राहो अशा उपरोधिक सूर असणाऱ्या शुभेच्छाही शिवसेनेकडून देण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे आता राजकीय वर्तुळातील घडामोडींना प्रचंड योग आला असून, साऱ्या देशाचच लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे २३ फेब्रुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाकडे.