नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येईल एक्झिट पोलनुसारही ते स्पष्ट बहुमत दिसू लागल्याचा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. हे स्पष्ट करत असतानाच सेनेच्या मुखपत्रात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे कौतुकही करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल आणि प्रियांका गांधी यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे फळ त्यांना मिळेल असे शिवसेनेने म्हटले आहे. या कठोर मेहनतीमुळे त्यांना विरोधी पक्षनेते पदासाठी पर्याप्त जागा मिळतील असा उपरोधिक टोला शिवसेनेने लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतांश एक्झिट पोलमध्ये पुन्हा भाजपा नेतृत्वातील स्पष्ट सरकार दिसू लागले आहे. काही एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित पक्षांना तीनशेहून अधिक जागा तर भाजपाला 272 हून अधिक जागा मिळण्याचे अनुमान लावले जात आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल हे सांगण्यासाठी कोणत्या राजकीय पंडीताची गरज नाही. मोदींना सत्तेत आणण्याचा विचार मतदारांच्या मनात होता हे दिसून आल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती ऐतिहासिक विजय मिळवेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.   



लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बोलवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव यांच्यासोबत सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हेदेखील या बैठकीसाठी दिल्लीत जाणार असल्याचे समजते. शिवसेना हा एनडीएमधील महत्त्वाच्या घटकपक्षांपैकी एक आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत आल्याने त्यांच्याकडून शिवसेनेसारख्या मित्रपक्षांकडे दुर्लक्ष झाले होते. यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव टोकाला पोहोचला होता. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतल्याने दोन्ही पक्षांमध्ये समेट घडून आला होता. 


नुकत्याच समोर आलेली एक्झिट पोलची आकडेवारी पाहता युतीमुळे शिवसेना आणि भाजप दोघांचा फायदा झालेला दिसत आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी प्रत्येकी १७ जागांवर शिवसेना आणि भाजप विजयी होतील, असा अंदाज एबीपी-नेल्सन या एक्झिट पोलने वर्तवला आहे.