शिवसेना खासदारांचा लोकसभेत गोंधळ, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
शिवसेनेचा हिवाळी अधिवेशनाच्य़ा पहिल्याच दिवशी गोंधळ
नवी दिल्ली : शिवसेना खासदारांनी लोकसभेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना खासदारांकडून होत आहे. ओला दुष्काळ संदर्भात शिवसेनेने स्थगन प्रस्ताव टाकला आहे. शिवसेना खासदार वेलमध्ये उतरले आहेत. लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं नंतर ऐकूण घेऊ असं म्हटलं आहे. शिवसेना खासदार सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर या गोष्टींचीच चर्चा होती. त्यामुळे आता शिवसेना विरोधकांच्या भूमिकेत दिसत आहे, संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळ पाहायला मिळाला.
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधेयकांसह अनेक मुद्यांवरून या अधिवेशनात भाजप सेना आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर एनडीएतून शिवसेना बाहेर पडली आहे. त्यामुळे आता शिवसेना संसदेत विरोधी बाकांवर बसली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून यापुढेही मोदी सरकारच्या धोरणांचा जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
'महाराष्ट्र सत्ता स्थापनेचं केंद्र आता दिल्ली बनलंय. नागरिकता सुधारणा विधेयकावरही शिवसेना सरकारवर हल्लाबोल करणार आहे. राष्ट्रहिताचे मुद्दे शिवसेना संसदेत उचलेल.' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपाला संसदेत विरोध करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.