आसाम सोडण्यापूर्वी बंडखोर आमदारांकडून पूरग्रस्ताना 51 लाखांची मदत
बंडखोर आमदांराकडून पूरग्रस्ताना मदत देण्यात आली आहे.
गुवाहाटी : महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाममध्ये मुक्कामी होते. आता हे सर्व आमदार गोव्याला जाणार आहेत. ज्या राज्यात ते थांबले आहेत तिथे सध्या पूर आला आहे. एकनाथ शिंदे गटाचे जवळपास 50 आमदार येथे थांबले होते.
शिवसेनेचे सर्व आमदार गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत आमदार मंदिराकडे रवाना झालेत. यानंतर ते गोव्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे. तेथून मग ते उद्या मुंबईत येणार आहेत.
गुवाहाटी सोडण्यापूर्वी बंडखोर आमदारांनी आसामच्या सीएम रिलीफ फंडात 51 लाख रुपयांची मदत केली आहे. ही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या 39 आमदारांसह बंडखोरी करत आधी सुरतला निघून गेले होते. त्यांच्यासोबत 10 अपक्ष आमदार देखील आहेत. सुरत हे महाराष्ट्रापासून जवळ असल्याने आणि या ठिकाणी शिवसेना नेते सहज पोहचत असल्याने या सर्व आमदारांना गुवाहाटीला हलवण्यात आले होते.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा गट हा आता भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे.
ठाकरे सरकारकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी 48 तासांची वेळ आहे. राज्यपालांनी यासाठी विशेष अधिवेशन बोलवलं आहे. पण या विरोधात महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. संध्याकाळी यावर निर्णय येणार आहे.