Husband Wife News Today: हेडफोन तोडले (Headphone) म्हणून नवरा-बायकोमध्ये झालेला वाद टोकाला गेला. दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. अखेर दोघांमधील नाते तुटण्याची वेळ आली तरीही कोणी मागे हटायला तयार नाही. अखेर समुपदेशकांनी त्यांच्यातील भांडणं सोडवून त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यास मदत केली. उत्तर प्रदेशमधील आग्रातील ही घटना आहे. दरम्यान हेडफोनमुळं झालेल्या वादानंतर महिला तीन महिने तिच्या माहेरी राहिली होती. अखेर एका अटीनंतर ती पुन्हा सासरी नांदायला तयार झाली होती. (Husband Wife Dispute Over Headphone)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून आली. जवळपास तीन महिने ती माहेरी होती. मात्र इतके महिने उलटूनही नवरा घ्यायला आळा नाही. तेव्हा तिने पोलिसांत तक्रार दिली.त्यानंतर या प्रकरणात सुनावणीसाठी हे प्रकरण परिवार परामर्श केंद्रात पोहोचले. समुपदेशक डॉक्टर सतीश खिरवार यांनी पती-पत्नीच्या वादाचे कारण जाणून घेताच कपाळावर हात मारला. दोघांच्या नात्यात एका हेडफोनमुळं वाद निर्माण झाला होता. 


ताजगंज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचे 4 वर्षांपूर्वी जगदीशपुरा येथे राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न झाले आहे. दोघांना एक मुलगीदेखील आहे. मात्र, 3 महिन्यांपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. पतीला संशय होता की पत्नीचे बाहेर अफेअर असून ती मोबाइलवर पूर्ण दिवस कोणाशीतरी बोलत असते. याच कारणामुळं रागात पतीने पत्नीच्या मोबाइलचा इअरफोनच तोडून टाकला. 


पतीने इअरफोन तोडल्यामुळं नाराज झालेल्या पत्नीने घर सोडले व ती माहेरी येऊन राहू लागली. पतीदेखील तीन महिने तिला घेण्यासाठी आला नाही. पती-पत्नीच्या वादाचे कारण ऐकून समुपदेशक डॉक्टर सतीश खिरवार यांनी दोघांची समजूत काढली. यावेळी पत्नीने पतीपुढे एक अट ठेवली. या अटीनुसार, पतीने नवीन इअरफोन आणून दिला तरच मी सासरी नांदायला जाईन, असं ठणकावून सांगितले. अखेर पतीनेही तिची ही अट मान्य केली. 


पतीने अट मान्य केल्यानंतर पत्नी त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली. पतीनेदेखील लगेचच तिच्यासाठी नवीन इअरफोन आणून दिले आहेत. दरम्यान इअरफोनमुळं तुटणारे हे नाते आणि त्याचा वाद हे दोन्ही चर्चेचा विषय ठरले आहेत.