मुंबई : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुस्लिम महिलेला भाजपला वोट करणं महागात पडलं आहे. खरेतर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यामुळे या महिलेला तिच्या नवऱ्याने घराबाहेर काढलं. एवढंच नाही तर तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट देण्याची देखील धमकी दिली आहे. याबातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकं देखील या घटनेचा विरोध करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्लिम महिलेला घरातून बाहेर काढण्यापूर्वी तिचा नवरा आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला मारहाणही केली. पीडिता मात्र मला मारू नका आणि घराबाहेर हाकलून देऊ नका, अशी विनवणी करत राहिली, मात्र तिच्या घरच्यांनी एकही शब्द ऐकला नाही.


नवरा आणि सासरच्या मंडळींनी केलेल्या अत्याचारानंतर आता महिलेने मदतीचे आवाहन केले आहे.


पीडितेचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते


बरेलीच्या बारादरी पोलीस स्टेशन परिसरातील एजाज नगर गोटिया येथे राहाणारी मुस्लिम महिला नजमा उजमसोबत ही घटना घडली. नजमाचा विवाह तिच्या शेजारी राहणाऱ्या तय्यब अन्सारीसोबत गेल्या वर्षी झाला होता. तय्यब अन्सारीसोबत तिने प्रेमविवाह केला होता.


महिलेनं सांगितले की, तिचा नवरा आणि सासरची मंडळीं समाजवादी पक्षाला पाठिंबा देत आहे. मात्र नजमाने निवडणुकीत भाजपला मतदान केले. नजमा यूपीच्या योगी सरकारच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाली होती. ज्यामुळे तिने भाजपला वोट करण्याचा निर्णय घेतला.


पीडित मुस्लिम महिला नजमा म्हणाली की, भाजपने धर्म, जात याच्या वरती उठून समाजासाठी काम केले आहे. भाजप सरकारने मोफत रेशन दिले, महिलांना सुरक्षा दिली. पण नजमाने भाजपला दिलेले मत तिचा नवरा आणि सासरच्या मंडळींना आवडले नाही. आता नजमा मेरा हक फाऊंडेशनच्या फरहत नक्वी यांच्याकडे मदतीसाठी गेली आहे.


नजमा म्हणते की, तिने देशहितासाठी मतदान केले होते, पण आता तिचा नवरा आणि सासरे तिचे शत्रू झाले आहेत.