श्रीनगरमध्ये डीएसपीची जमावाकडून हत्या, मृतदेहाची ओळख पटवणंही कठिण
श्रीनगरच्या एका मुख्य भागातील मस्जिदच्या जवळच जमावानं मारहाण करत डीएसपी मोहम्मद अयूब यांची हत्या केलीय.
श्रीनगर : श्रीनगरच्या एका मुख्य भागातील मस्जिदच्या जवळच जमावानं मारहाण करत डीएसपी मोहम्मद अयूब यांची हत्या केलीय.
डीएसपीनं केलेल्या कथित फायरिंगमध्ये तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर भडकलेल्या जमावानं गुरुवारी रात्री जामिया मस्जिदच्या बाहेर पोलीस अधीक्षक अयूब पंडित यांच्यावर दगडफेक आणि मारहाण केली.
न्यूज एजन्सी पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, नमाज अदा करण्याच्या वेळी एका समूहानं मस्जिदच्या बाहेर अयूब पंडित यांना फोटो घेताना पाहिलं होतं. जेव्हा लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कथित रुपात पंडित यांनी फायरिंग केलं.... यात तीन जण जखमी झाले.
त्यानंतर भागातील तणाव कमी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नौहट्टा भागात शुक्रवारी सकाळी पोलिसांना मृतदेह सापडला. या नग्न मृतदेहाची ओळख पटवणंही कठिण झालं होतं. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ओळख पोलीस ऑफिसर अयूब पंडित अशी करण्यात आली. ते नौहट्टा जवळच्या खानयार क्षेत्राचे रहिवासी होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डीएसपी अयूब पंडित जामिया मस्जिदजवळ ड्युटीवर तैनात होते. ते आपलं कर्तव्य निभावत असताना एका टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कर्तव्य निभावताना आणखी एका ऑफिसरनं आपल्या जीवाची आहुती दिल्याचं ट्विट केलंय.