Udaipur Murder Case: राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या एका टेलरची दुकानात घुसून हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी टेलरचा गळा चिरून निर्घृण हत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयपूरमधील मालदास स्ट्रीट परिसरात ही भीषण घटना घडली आहे. टेलरवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. मृत व्यक्तीने काही दिवसांपूर्वी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या.


टेलरच्या हत्येची माहिती मिळताच व्यापाऱ्यांनी निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवली. या क्रूर घटनेच्या विरोधात स्थानिक लोकांनीही निदर्शनेही केली. तणावाचं वातावरण पाहता मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे.


नुपूर शर्मावर पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे, ज्याला टेलर कन्हैय याने पाठिंबा दिला होता. त्यामुळे कैन्हयावर मारेकऱ्यांचा प्रचंड संताप होता. 


उदयपूरमधील या हत्येच्या घटनेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. 'उदयपूरमधील तरुणाच्या निर्घृण हत्येचा निषेध. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल. पोलिस गुन्ह्याच्या तळापर्यंत जातील. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असं ट्विट अशोक गेहलोत यांनी केलं आहे. 


तसंच आणखी एक ट्विट करत गेहलोत यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. 'मी सर्वांना आवाहन करतो की, या घटनेचा व्हिडिओ शेअर करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. व्हिडिओ शेअर करून समाजात द्वेष पसरवण्याचा गुन्हेगाराचा हेतू सफल होईल, असं आवाहन अशोक गेहलोत यांनी केलं आहे.