Shraddha Walkar Murder Case: वसईमधील श्रद्धा वालकरच्या हत्याप्रकरणामध्ये (Shraddha Walkar) श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी सोमवारी काही धक्कादायक आरोप मुख्य आरोपी असलेल्या आफताब पूनावालावर (Aftab Poonawalla) केले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना विकास वालकर यांनी, आफताब पूनावालाच्या आई-वडिलांना कुठेतरी लपवण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये त्यांनी समोर येऊन बोललं पाहिजे असं म्हटलं आहे. आफताबच्या आई-वडिलांना अद्याप समोर आणण्यात आलेलं नाही. मला वाटतं की ते कुठेतरी लपून बसलेले आहेत. ते नेमके कुठे आहेत? मी त्यांना समोर येण्याचं आवाहन करतो, असं विकास वालकर म्हणाले आहेत. तसेच आपल्याला आपल्या मुलीचे म्हणजेच श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. त्यासाठी तिच्या शरीराच्या तुकड्यांचे अवशेष मला दिले जावेत असंही विकास वालकर म्हणाले.


हत्येला एक वर्ष पूर्ण होईल पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफताबला मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी विकास वालकर यांनी पुन्हा एकदा केली. "तो दोषी असून त्याला मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली पाहिजे. त्याने नियोजनपूर्वक पद्धतीने श्रद्धाची हत्या केली. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी यासंदर्भात माझं वकीलांशी बोलणं झालं आहे," अशी माहितीही विकास वालकर यांनी दिली. मार्च महिन्यामध्ये आपल्या मुलीच्या हत्येसंदर्भात बोलताना विकास यांनी, मे महिन्यात तिच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होईल. मात्र तिच्या मृतदेहावर अद्याप अंत्यसंस्कार करता आलेले नाही असंही म्हटलं. मात्र आपण आफताबला मृत्यूदंडाची शिक्षा झाल्यानंतरच मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


वेळेत सुनावणी करा


सध्या कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याने विकास वालकर यांना श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष दिले जाणार नाहीत. म्हणूनच त्यांना सध्या श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येणार नाहीत. वेळेत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण व्हावी अशी मागणीही श्रद्धाच्या वडिलांनी केली आहे.


प्ले करण्यात आला श्रद्धाचा तो ऑडिओ


सीमा कुशवाहा या कोर्टासमोर विकास वालकर यांची बाजू मांडत आहेत. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी 7 वर्षांचा कालावधी लागला. तितका या प्रकरणात लागू नये, अशी अपेक्षा सीमा यांनी व्यक्त केली. आफताबसमोरच कोर्टात त्याच्या आणि श्रद्धाच्या ऑनलाइन काउन्सलिंगची ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. ते पाहून विकास वालकर भावूक झाले. "तो मला शोधून माझी शिकार करेल," असं श्रद्धा या ऑडिओमध्ये बोलत असल्याचं समजतं. आफताबने एकदा आपला गळा पकडल्याचंही श्रद्धा या ऑडिओमध्ये सांगते. या प्रकरणाची रोज सुनावणी झाली पाहिजे अशी सीमा यांची मागणी आहे. तसं झालं नाही तर हे प्रकरण अनेक वर्ष न्यायप्रविष्ठच राहील असंही त्या म्हणाल्या.