मुंबई : वाढती महागाई आणि इंधानाच्या वाढत्या किंमतीमधून दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलही आता उधार मिळणार आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी आता हिंदूस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांना पेट्रोल-डिझेल उधार देणार आहे. पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यासाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लोन उपलब्ध करून देणार आहे. या ऑफरसाठी श्रीराम ट्रान्सपोर्टनं हिंदूस्तान पेट्रोलियमसोबत करार केला आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट सध्या व्यावसायिक वापरासाठीची वाहनं आणि टायर खरेदी करण्यासाठी लोन देते. पण आता पेट्रोल-डिझेलसाठीही लोन देण्यात येणार आहे. ही लोन सुविधा ओटीपीवर आधारित असणार आहे. हे लोन ३० दिवसांमध्ये फेडावं लागणार आहे.


कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन


कॅशलेस इकोनॉमी आणि डिजीटल इंडिया मिशनला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीनं ही ऑफर आणली आहे. पेट्रोल-डिझेलसाठी लोन घ्यायचं असल्यास ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपीच्या मार्फत लोन देण्यात येईल. लोनवरचं पेट्रोल-डिझेल वापरल्यामुळे ग्राहकांना लॉयल्टी पॉईंट आणि विम्याची सुविधाही मिळणार असल्याचं हिंदूस्तान पेट्रोलियमनं सांगितलं आहे.