नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगूल निवडणूक आयोगाकडून अदयाप वाजायचे आहे. तोपर्यंत राजकीय पक्षांनी मात्र आरोप प्रत्यारोपाच्या तुताऱ्या वाजवायला जोरदार सुरूवात केली आहे. कर्नाटकमधील जनतेला बुधवारी याचा प्रत्यय आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सिद्दरमय्या आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात जोरदार शाब्दीक युद्ध पहायला मिळाले.


कर्नाटक सरकार हिंदू विरोधी - शहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी रणनिती आखायला सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून अमित शहा यांनी कर्नाटक परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत शहा यांनी कर्नाटक सरकारला हिंदूविरोधी म्हटले. तसेच, कर्नाटकातील कॉंग्रेस सरकार व्होट बॅंक पॉलिटीक्स करत असल्याचा आरोपही केला. राज्यातील कॉंग्रेस सरकारने SDPI (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) विरूद्धचे सर्व खटलेही या सरकारने मागे घेतले, असेही शहा म्हणाले.


देशाची शांतता भंग करणाऱ्यांना सहन करणार नाही - सिद्दरमय्या


दरम्यान, अमित शहा यांच्या आरोपाल सिद्दरमय्या यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. सिद्दरमय्या म्हणाले की, भाजप, आरएसएस, बजरंग दल या संघटनांमध्ये कट्टरतावाद आणि हिंसावाद भरला आहे. जो या देशातील शांतीसाठी घातक आहे. आमचे सरकार या देशातील शांततेला कधीही धक्का लागू देणार नाही. तसेच, देशातील शांततेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा शक्तीला आम्ही सहन करणार नाही. मग ती शक्ती बजरंग दल असो किंवा SDPI.


गुजरातमुळे पक्ष नेतृत्त्वावर प्रचंड टीका


गुजारतमध्ये भाजपने १८२ जागांपैकी १५० जागांचे लक्ष ठेवले होते. मात्र, भाजपला शंभरीही पार करता आली नाही. त्यामुळे भाजप आणि पर्यायाने पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या दुकलीला प्रचंड टीका सहन करावी लागली. इतकी की, भाजपच्या गोटातूनच प्रश्न उमटायला लागले की, खरेच इतके मोठे लक्ष्य ठेवण्याची गरज होती का?


बूथ लेवलपर्यंत काँग्रेसची मोर्चेबांधणी


महत्त्वाचे असे की, 2018मध्ये विधानसभा निवडणुकांची सुरूवातच कर्नाटकमधून होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडच्या या राज्यात सत्ता कायम राखत विजयी सुरूवात करण्याचा काँग्रेसचा मनसूबा आहे. त्यामुळे काँग्रेस आतापासूनच कामाला लागला आहे. अर्थात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विरोधकही सिद्धरमय्या यांचे कर्नाटकातील प्रस्त ओळखून आहेत. पण, तरीही काँग्रेस कोणताही धोका स्विकारायला तयार नाही असे दिसते. म्हणूनच काँग्रेसने अगदी बूथ लेवलपर्यंत मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.